नागपूर : डॉ. आरती सिंह यांच्याकडून उद्धव ठाकरेंना महिन्याला 7 कोटी मिळायचे, रवी राणांचा आरोप | पुढारी

नागपूर : डॉ. आरती सिंह यांच्याकडून उद्धव ठाकरेंना महिन्याला 7 कोटी मिळायचे, रवी राणांचा आरोप

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह ह्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महिन्याला सात कोटी रूपयांची वसुली करून पाठवायच्या, असा गंभीर आरोप बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी केला आहे. तत्कालिन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना खुश करण्यासाठी आरती सिंह यांनी खासदार नवनित राणा आणि माझ्यावर खोट्या आरोपात गुन्हे दाखल केलेत असाही आरोप राणा यांनी केला.

नागपुर विमानतळावर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. रवी राणा यांनी आरोप करताना असे सांगितले की, पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी अमरावतीत वसुली पथक स्थापन केले होते. या वसुली पथकाच्या माध्यमातून जमा झालेला पैसा तत्कालिन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठवायच्या. वसुली पथकामुळे अमरावतीत गुन्हेगारी वाढली, दंगे झाले, दरदिवशी दोन ते तीन हत्या होत आहे, चोर्‍या वाढल्या आहेत असाही आरोप त्यांनी केला. मागील अडीच वर्षाच्या काळात दर महिन्याला अमरावतीतून उध्दव ठाकरे यांना सात कोटी रूपयांची वसुली आरती सिंह पाठवत होत्या. यासंदर्भातील ऑडिओ रेकॉर्डींग सारखे ठोस पुरावे सीआयडीकडे देणार असल्याचेही रवी राणा यांनी सांगितले. मागील अडीच वर्षाच्या काळात आमच्यावर कित्येक खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ज्या ज्या लोकांनी आरती सिंह यांना फोन करून आमच्यावर गुन्हे दाखल करण्याबाबत दबाव तयार केला त्या सर्वांचे ऑडिओ रेकॉर्डींग असल्याचे राणा यांनी सांगितले. आमच्यावर गुन्हे दाखल करण्याचा एकसुत्री कार्यक्रम आरती सिंह यांनी राबविला. लव्ह जिहाद सारख्या प्रकरणात सुध्दा पोलीस आयुक्तांनी सौम्य भुमिका स्विकारली. याबाबतचे सर्व ठोस पुरावे सीआयडीकडे देणार असल्याचे राणा यांनी सांगितले. लवकरच आरती सिंह यांच्या कारनाम्याचा पर्दाफाश करणार असल्याचे राणा यांनी सांगितले.

Back to top button