नागपूर : बुटीबोरी वनपरिक्षेत्रात महिनाभरात वाघाचे दुसऱ्यांदा दर्शन, शेतकरी, नागरिकांमध्‍ये भीतीचे वातावरण | पुढारी

नागपूर : बुटीबोरी वनपरिक्षेत्रात महिनाभरात वाघाचे दुसऱ्यांदा दर्शन, शेतकरी, नागरिकांमध्‍ये भीतीचे वातावरण

नागपुर;पुढारी वृत्तसेवा: राज्यात वाघांची संख्या ३० टक्‍क्‍यांनी वाढली असून, नागपूर जिल्ह्यातही वाघांचा आकडा वाढलेला दिसत आहे. नागपूरपासून २० किमी असलेल्या बुटीबोरी वनपरिक्षेत्रात येणाऱ्या पांजरी लोधी गावात महिनाभरात दुसऱ्यांदा वाघ दिसला. त्‍याने जनावरांवर हल्ला केला आहे. यापूर्वी २५ जुलै रोजी येथील शेतकऱ्यांना वाघ दिसला होता. त्यामुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिसराची तपासणी केली. या वेळी वाघाच्या पावलांचे ठसे आढळून आले. येथील लीलाधर चंद्रभान मोडक यांची शेती जंगल क्षेत्राला लागूनच आहे. त्यांच्या शेतातून वाघ गेल्याचे आढळून आले आहे. वाघाने त्यांच्या जनावरांवर देखील हल्ला केला आहे. फक्त जंगलाला लागूनच असलेल्या शेतीत वाघ दिसून आला आहे.

परिसरात लावण्‍यात आले कॅमेरे

या परिसरात वनविभागाची टीम कार्यरत आहे. तसेच कॅमेरेही लावण्यात आले आहेत. याविषयी गावात माहिती देण्यात आली असून, शुक्रवारपासून पथक गस्त आणि जनजागृती करण्यात येणार असल्याचे वनविभागाने सांगितले आहे. यापूर्वी २५ जुलै रोजी पांजरी लोधी गावापासून एक किमीवर जंगल परिसरात शाळेच्या विद्यार्थ्यांना एक वाघ बछड्यासह दिसला होता. त्‍याने एक गवा तसेच पाळीव जनावरांची शिकार केली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण झाले आहे.

बोर ते उमरेड कऱ्हांडला आणि बोर ते ताडोबा हा वन्यप्राण्यांचा भ्रमणमार्ग आहे. हा जंगल परिसर हिंगणा वनपरिक्षेत्रात येतो. त्यामुळे येथे वाघांसह इतरही वन्यप्राण्यांचा वावर आहे. लोकांनी कुठल्याही कारणास्तव एकट्याने जंगलात जाऊ नये. गरज भासल्यास वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन जावे, असे आवाहन वन्यजीव अभ्यासक कुंदन हाते यांनी केले आहे.

यापूर्वी मिहानमधील इन्फोसिसजवळ शहराच्या वेशीवर आलेल्या वाघामुळे शेतकऱ्यांमध्येच नव्हे तर कर्मचाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण होते. यापूर्वी ९ डिसेंबर २०१९ मध्ये मिहान परिसरात वाघ दिसला होता. हा वाघ नंतर बोर राखीव व्याघ्र प्रकल्पाकडे निघून गेला. उमरेड कऱ्हांडला अभयारण्यालगतच्या परिसरात वाघ व इतर वन्यप्राण्यांमुळे नुकसान झाल्याच्या घटना वारंवार घडत आहेत.

हेही वाचा:

Back to top button