नगर : शालेय क्रीडा स्पर्धांना सप्टेंबरमध्ये प्रारंभ? राज्यातील रखडलेल्या स्पर्धांबाबत आठवडाभरात निर्णय होण्याची शक्यता | पुढारी

नगर : शालेय क्रीडा स्पर्धांना सप्टेंबरमध्ये प्रारंभ? राज्यातील रखडलेल्या स्पर्धांबाबत आठवडाभरात निर्णय होण्याची शक्यता

नगर : पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील रखडलेल्या शालेय क्रीडा स्पर्धा येत्या सप्टेंबर महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. कोरोना व अन्य काही कारणांमुळे रखडलेल्या या स्पर्धा सुरू व्हाव्यात म्हणून शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाने शिक्षक आ. कपिल पाटील यांच्याकडे निवेदन सादर केले होते. त्यांनी तत्परता दाखवत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विशेष उल्लेखाद्वारे क्रीडा स्पर्धांबाबत प्रश्न उपस्थित केला. यानंतर क्रीडा मंत्रालय स्तरावर शालेय क्रीडा स्पर्धांबाबत येत्या आठ ते दहा दिवसांत निर्णय होऊन सप्टेंबर महिन्यात या क्रीडा स्पर्धांना प्रारंभ होईल, अशी माहिती क्रीडा उपसंचालक महादेव कसगावडे यांनी दिली.

कोव्हिडच्या प्रभावामुळे सन 2020-21 व 2021-22 या शैक्षणिक वर्षांत शालेय क्रीडा स्पर्धा घेऊ नयेत, असे शासन आदेश होते. विविध शालेय क्रीडा स्पर्धा होऊ न शकल्याने राज्यातील खेळाडूंचे मोठे नुकसान झाले होते. या संदर्भात क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी शालेय सचिवांना पत्र दिले होते. या पत्रावर निर्णय न झाल्याने या स्पर्धांना मंजुरी मिळाली नाही. या स्पर्धा भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारे घेण्यात येत असून, त्यात वाद निर्माण झाल्याने क्रीडा मंत्रालयाने त्यांची मान्यता रद्द केली. यामुळे स्पर्धांना ब्रेक लागला होता.

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने यावर तोडगा काढत भारतीय शालेय खेळ महासंघाची अ‍ॅडहॉक कमिटी बनवून या कमिटीला या स्पर्धा घेण्याबाबत सूचना दिल्या असून, त्या प्रमाणे अन्य राज्यांत या स्पर्धांना प्रारंभ झाला आहे. त्यानुसार महाराष्ट्रातही क्रीडा स्पर्धांबाबतचा निर्णय लवकर होऊन क्रीडा स्पर्धांना प्रारंभ होण्याची शक्यता आहे. शालेय क्रीडा स्पर्धांना प्रारंभ झाला नाही. ही बाबत खेदजनक आहे; परंतु येत्या आठ ते दहा दिवसांत शालेय क्रीडा स्पर्धांबाबत निर्णय होऊन सप्टेंबरमध्ये स्पर्धांना प्रारंभ होईल. क्रीडामंत्री याबाबत सकारात्मक असून, त्यांनी शालेय क्रीडा स्पर्धांच्या निर्णयाबाबत ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे या स्पर्धांना लवकरच प्रारंभ होईल.
– महादेव कसगावडे, क्रीडा उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे

कोव्हिड काळामध्ये दोन वर्षे शालेय क्रीडा होऊ न शकल्याने राज्यातील खेळाडूंचे नुकसान झाले आहे. राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये पूर्ववत सुरू झाली असूनही, या स्पर्धांना प्रारंभ झाला नाही. त्यामुळे या रखडलेल्या शालेय क्रीडा स्पर्धा सुरू व्हाव्यात, म्हणून क्रीडा शिक्षक महासंघाच्या माध्यमातून क्रीडा मंत्री शिरीश महाजन यांना निवेदन दिले आहे. त्यांनी यासंर्भात सकारात्मकता दाखवली आहे.
– राजेंद्र कोतकर, अध्यक्ष, शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ

Back to top button