पंढरपूर : अभिजीत पाटील यांच्या साखर कारखान्यांसह घरावर आयकर विभागाची छापेमारी | पुढारी

पंढरपूर : अभिजीत पाटील यांच्या साखर कारखान्यांसह घरावर आयकर विभागाची छापेमारी

पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा : धाराशिव साखर कारखाना युनिट नं.1,2,3,4, व विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, युवा उद्योजक आणि डीव्हीपी उद्योग समूहाचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या कारखान्यावर आयकर विभागाने छापेमारी सुरु केली आहे. या छापेमारीत धाराशिव साखर कारखाना तसेच डिव्हीपी उद्योग समुह येथील ऑफिस, समृद्धी ट्रॅक्टर शोरुम तसेच घरावरदेखील छापेमारी सुरु आहे. या घटनेमूळे पंढरपूर तालूक्यात एकच खळबळ उडाली आहे.

बंद पडलेले साखर कारखाने भाडेतत्वावर चालवायला घेवून ते यशस्वीपणे चालवण्यात येत आहेत. सांगोला येथील साखर कारखानादेखील मागील हंगामात सुरु केला आहे. तर नुकत्याच झालेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत 21 पैकी 20 संचालक निवडून आणत विठ्ठल कारखान्यात त्यांनी एकहाती सत्ता मिळवली आहे. तसेच विठ्ठलचे चेअरमन म्हणून देखील त्यांचीच निवड झाली आहे. साखर कारखाने, डिव्हीपी उद्योग समुह, समृध्दी ट्रॅक्टर्स, पतसंस्था यांची त्यांनी उभारणी केलेली आहे. अल्पावधीत नावारुपाला आलेले अभिजीत पाटील राजकारणातही सक्रीय होऊ लागले आहेत.

साखर कारखानदारी क्षेत्रातलं एक मोठं नाव असलेल्या अभिजीत पाटील यांच्या साखर कारखान्यांवर आयकर विभागानं धाडी टाकल्या आहेत. सकाळी साडेसहा वाजल्यापासून चार साखर कारखान्यांवर एकाचवेळी धाडी टाकण्यात आल्या आहेत. या धाडीत नेमके काय हाती लागले, हे मात्र अद्याप समजलेले नाही. मात्र आयकर विभागाने धाडी टाकल्याचे समजताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचलंत का ?

Back to top button