नागपूर : अंधश्रध्देतून झालेल्या चिमुकलीच्या मृत्यूनंतर धक्कादायक खुलासे उघड

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : भूताला घरात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी त्यांनी चक्क घरात पांढरे दोरे बांधल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. नागपुरात अंधश्रध्देतून झालेल्या चिमुकलीच्या मृत्यूनंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर येऊ लागले आहेत. मुलगी अनक्षी ऊर्फ गुडियाला (वय ५) भूतबाधा झाल्याचे समजून ती बाधा उतरविण्यासाठी सिद्धार्थ प्रल्हाद चिमणे (वय ४५, रा. कामगारनगर, सुभाषनगर) याने संपूर्ण घरात पांढरा धागा बांधला, अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासादरम्यान समोर आली. दरम्यान, या प्रकरणात अटकेतील भोंदूबाबा नामदेव बांबोडे ऊर्फ शंकरबाबा (वय ५०, रा. चंद्रपूर) याला प्रतापनगर पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची १२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली.

अनक्षी हत्याकांड प्रकरणात अटकेतील तिचा वडील सिद्धार्थ, त्याची पत्नी रंजना (वय ४१) व नातेवाइक प्रिया अमर बन्सोड (वय ३५, रा. भिवापूर वॉर्ड, चंद्रपूर) हे तिघेही पोलीस कोठडीत आहेत.

प्रियाच्या माध्यमातून चिमणे दाम्पत्याची शंकरबाबासोबत ओळख झाली. मुलगी अनक्षीला भूतबाधा झाल्याचे त्याने बाबाला सांगितले. शंकरबाबाने टाकळघाट येथे पूजा केली. त्यानंतर त्याने पांढऱ्या रंगाच्या धाग्याचे बंडल सिद्धार्थला दिले. हा धागा संपूर्ण घरात बांधल्यास भूत घरात प्रवेश करणार नाही, असेही तो म्हणाला. त्यानंतर सिद्धार्थने हा धागा घरात बांधला. कोणालाही माहिती पडू नये, म्हणून तो प्रिया वगळता अन्य नातेवाइक व शेजारी राहणाऱ्यांनाही घरात येऊ देत नसे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सिद्धार्थचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. त्याचे हिंदी व मराठी भाषेवर प्रभूत्व आहे. यू-ट्यूब चॅनलच्या माध्यमातून तो नागरिकांच्या समस्या साोडविण्‍याचा दावा करायचा. नागरिकांचे उद्बोधन करणारा अंधश्रद्धेला बळी जाईल किंवा उपाशी ठेऊन मुलीचा खून करेल, असे कोणालाही वाटले नव्हते. अंबाझरी घाटावर अनक्षीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सिद्धार्थ व रंजनाही तेथे होते. मुलीकडे बघून दोघेही ढसाढसा रडायला लागले. बाबाने आम्हाला संमोहित केले. आमचा यात काहीही दोष नाही, असे ते नातेवाइकांना सांगत होते.

हेही वाचलंत का ? 

Exit mobile version