चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कृत्रिम अभयारण्याच्या प्रस्तावास स्थगिती द्या | पुढारी

चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कृत्रिम अभयारण्याच्या प्रस्तावास स्थगिती द्या

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अभयारण्य हे जगात वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासासाठी प्रसिध्द आहे. असे असताना देखील लोहारा येथे कृत्रिम अभयारण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे कोर झोनमधील पर्यटक संख्या घटून पर्यटन महसुलावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृत्रिम अभयारण्याच्या प्रस्तावास स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी आमदार प्रतिभा सुरेश धानोरकर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेऊन हा विषय मांडला.

जगभरातून पर्यटन प्रेमी वाघांसह अन्य वन्यजीवांचा मुक्तसंचार ताडोबा अभयारण्यात होत असताना पर्यटन प्रेमी आस्वाद घेत असतात. परंतु ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर व कोर झोनला लागून लोहारानजीक कृत्रिम अभयारण्य तयार होणार आहे. पर्यटनाला येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी होऊन शासनाच्या महसुलातदेखील घट निर्माण होऊ शकते.

चंद्रपूरपासून १५० किमी नागपूर येथील गोरेवाडा येथे कृत्रिम अभयारण्य असल्याने चंद्रपूरातील ताडोबात अभयारण्याची गरज वाटत नाही. नवीन कृत्रिम अभयारण्य न करता कोरझोनमधील क्षेत्रांमध्ये वाढ करून वाघांसह अन्य वन्यजीवांना नैसर्गिक अधिवास असावा याकरिता ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कृत्रीम अभयारण्याच्या प्रस्तावास स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे.

Back to top button