मडगाव; पुढारी वृत्तसेवा : राज्यात होऊ घेतलेल्या सरकारी प्रकल्पांना विरोध करणे हे आता नित्याचे झाले आहे. आयआयटीप्रमाणे सांगेवासीयांनी साळावली धरणाला विरोध केला असता तर दक्षिण गोव्याला पाणीपुरवठा करणारे धरण उभे झाले नसते. आयआयटीची आवश्यकता राज्याला आहे. स्थानिकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे रोजगार मिळणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी केले.
वीज मंत्रालयाने सांगेत अयोजित केलेल्या उज्वल भारत उज्वल भविष्य या कार्यक्रमात काब्राल बोलत होते. यावेळी समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर, सांगेच्या नगराध्यक्षा सुरेश नाईक तारी आदी उपस्थित होते. साळावली धरणासाठी पूर्वजांनी आपले गाव सोडून दिले होते. केवळ विरोध करायचा म्हणून विरोध करू नका. आयआयटी प्राकल्पाचा फायदा दोन्ही मतदारसंघांना होणार आहे. त्यामुळे आपला आयआयटीला पाठिंबा असल्याचे ते म्हणाले.
देशभरात कोळशाच वापर करून वीजनिर्मिती केली जाते. गोव्याला वीज मिळावे यासाठी दुसर्या राज्यात कोळसा जळतो. तमनार प्रकल्प ही काळाची गरज आहे. दर वर्षी पाच टक्के विजेची आम्हाला गरज भासते. त्यासाठी कोणत्याही परिस्थितीत तमनार प्रकल्प होणे गरजेचे आहे, असे काब्राल म्हणाले.
समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले की, राज्यात काही गट आहेत ज्यांचे काम राज्यात होऊ घातलेल्या प्रकल्पांना विरोध करणे हेच आहे. लोकांना मोबाईल हवे आहेत पण टॉवर नकोत. वीज उपकरणे हवीत, पण वीज निर्मितीसाठी सरकार आणत असलेल्या प्रकल्पांना विरोध केला जात आहेत. गोव्याला रोजगाराच्या संधी हव्या आहेत. विनाकारण विरोध करत राहिल्यास भविष्यात कोणीही गोव्यात गुंतवणूक करण्याचे धाडस करणार नाहीत, अशी चिंता फळदेसाई यांनी व्यक्त केली. सांगेत होणारा आयआयटी हा शुद्ध हरित प्रकल्प आहे. त्यातून कोणत्याही स्वरूपाचे प्रदूषण होणार नाही, असे फळदेसाई म्हणाले.
मला खलनायक बनवू नका : फळदेसाई
आयआयटी प्राकल्पाच्या विषयावरून मला खलनायक बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी या प्रकल्पासाठी दादागिरी केलेली नाही. शेतकर्यांच्या पोटावर पाय ठेवण्याची भाष केली नाही. या प्रकल्पातून मला कोणताही फायदा नाही.सरकारच्या जागेत हा प्रकल्प येतो. त्यातून मला काय फायदा होणार आहे. माझा स्वतःचा व्यवसाय आहे. दररोज वीस गायींचे दूध काढणे हा माझा नित्यक्रम आहे. आयआयटीचा फायदा संपूर्ण सांगेला होणार आहे.त्या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी मला खलनायक बनवू नका, असे आवाहन सुभाष फळदेसाई यांनी केले आहे.