नाशिक : पुढारी वृत्तसेवा
व्यवसायाची महत्त्वाची माहिती चोरून ईडी (सक्तवसुली संचलनालय) व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करून समाजात बदनामी करण्याची धमकी देत एकाने व्यावसायिकाकडून पाच लाख रुपयांची खंडणी घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करून संशयित मारुती रमेश खोसरे यास पकडले.
समीर सीताराम सोनवणे (41, रा. महात्मानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित मारुती खोसरे याने 24 जून ते 25 जुलैदरम्यान धमकावत पाच लाख रुपयांची खंडणी घेत एकूण 47 लाख रुपयांची मागणी केली होती. संशयित मारुती खोसरे हा समीर सोनवणे यांच्याकडे पाच वर्षांपूर्वी कामास होता. कामावर असताना त्याने बांधकाम व्यवसायाशी संबंधित महत्त्वाची माहिती संगणकातून चोरली होती. त्यानंतर जूनमध्ये त्याने त्याचा मित्र रमाकांत डोंगरेमार्फत सोनवणे यांच्याकडे निरोप पाठवून तुमच्या बांधकामाशी संबंधित चोरी केलेली माहिती ईडी व लाचलुचपत प्रतिबंधक विभागास पाठवून तुमची बदनामी करेल, अशी धमकी देत खंडणीची मागणी केली. यामुळे सोनवणे यांनी संशयितास 25 जुलैला पाच लाख रुपयांची खंडणी दिली. मात्र, तरीदेखील खोसरे याने पुन्हा खंडणीची मागणी केल्याने सोनवणे यांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांनी तपास करून मारुती खोसरे यास पकडले. त्यास न्यायालयाने29 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
शेअरमधील गुंतवणुकीमुळे कर्जबाजारी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुती खोसरे हा मूळचा बुलडाणा येथील आहे. त्याने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली असता त्याच्यावर 22 ते 23 लाख रुपयांचे कर्ज झाले आहे. कर्जफेड करण्यासाठी त्याने चोरलेल्या माहितीचा वापर करून सोनवणे यांच्याकडे सुरुवातीस एक कोटी रुपयांची खंडणी मागितली. तडजोड करून त्याने 47 लाख रुपयांची खंडणी घेण्याचे मान्य केले.