कोळगाव : पुढारी वृत्तसेवा : श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे मोहोरवाडी शिवारात सोमवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी घराच्या ग्रीलचा कडीकोयंडा तोडून घरात झोपलेल्या वृद्ध दाम्पत्याला मारहाण करत त्यांच्या अंगावरील 90 हजार रुपये किमतीचे दागिने नेले. पोलिस अधिकार्यांनी घटनास्थळाला भेट देऊन श्वान पथकाला पाचारण केले. एकनाथ अंतू हराळ आणि उषा एकनाथ हराळ असे चोरट्यांच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वृद्ध दाम्पत्याचे नाव आहे. घटनेची माहिती समजताच बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र चाटे यांनी भेट देऊन पाहणी करत श्वानपथकाला पाचारण केले.
याबाबत दिलेल्या फिर्यादीनुसार तालुक्यातील कोळगाव येथील मोहोरवाडी परिसरात एकनाथ अंतू हराळ हे पत्नीसह घरात झोपले असताना सोमवार दि.25 रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास तीन चोरट्यांनी घराचा दरवाजाची कडीकोयंडा उघडून घरात प्रवेश करत त्यांची पत्नी उषा यांना मारहाण करीत यांच्या कानातील, तसेच अंगावरील दागिने ओरबाडले, या झटापटीत वृद्ध महिला गंभीर जखमी झाली. एकनाथ हराळ यांना लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी करीत 89 हजार 500 रुपयांचा ऐवज घेऊन पळून गेले.
आरडाओरडा ऐकून शेजारी असणार्या शरद मोहारे, भूषण मोहारे, नवनाथ मोहारे, सागर बाराथे यांनी वृद्ध दाम्पत्याला कोळगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. एकनाथ हराळ यांच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. चोरीचा तपास लवकरात लवकर लावावा, अशी मागणी माजी सभापती पुरुषोत्तम लगड, श्रीगोंदा कारखान्याचे माजी संचालक हेमंत नलगे, सरपंच वर्षा काळे, उपसरपंच सारिका मोहारे, माजी उपसरपंच अमित लगड, ग्रामपंचायत सदस्य विजय नलगे, संतोष मेहत्रे, तसेच इतर ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, भर पावसाळ्यात ग्रामीण भागात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, वृद्ध दाम्पत्याला मारहाण केल्यामुळे कोळगाव परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
श्वान पथकाला केले पाचारण
घटनेची माहिती समजताच बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र चाटे यांनी भेट देऊन पाहणी करत श्वानपथकाला पाचारण केले. सातत्याने होणार्या चोर्या, घरफोड्या यामुळे पोलिसांच्या समोर चोरांनी आव्हान उभे केले आहे.