दुधात मिठाचा खडा टाकण्याचा धंदा बंद करावा – देवानंद बागल

दुधात मिठाचा खडा टाकण्याचा धंदा बंद करावा – देवानंद बागल
Published on
Updated on

करमाळा : पुढारी वृत्तसेवा बारामती अ‍ॅग्रोने बेकायदेशीरपणे राजकीय सत्तेचा वापर करून 'आदिनाथ'चा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. आमदार रोहित पवार यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे तीन वर्षार्ंपासून कारखाना बंद आहे. गतवर्षी करमाळ्यातील ऊस उत्पादकांना ऊस गाळप न झाल्यामुळे ऊस पेटवून द्यावा लागला. या सर्व शेतकर्‍यांचा तळतळाट रोहित पवारांना लागला आहे. आता तरी सुभाष गुळवे यांनी दुधात मिठाचा खडा टाकण्याचा धंदा बंद करावा, अशी जहरी टीका देवानंद बागल यांनी केली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील इतर कारखान्यांना तीन-तीनशे कोटी रुपये कर्ज दिले जाते, मात्र आदिनाथ कारखान्याचा केवळ 25 कोटी रुपयांच्या थकबाकीसाठी लिलाव केला जातो. हे पाप सुभाष गुळवे यांनी पुढाकार घेऊन केले आहे. त्यांचे खरेच करमाळा तालुक्यावर प्रेम असले असते तर त्यांनी तीन वर्षांपूर्वीच आदिनाथ कारखाना सुरू केला असता. गेल्या वर्षी बारामती अ‍ॅग्रोचे विस्तारीकरण झाले होते. त्यांना यासाठी किमान 17 ते 18 लाख टन ऊस गाळपासाठी आवश्यकता होती. त्यांना एवढा ऊस बारामती तालुक्यातून मिळणार नव्हता. या सर्व बाबींचा विचार करून कपटनीतीने आदिनाथ कारखाना आमदार रोहित पवारांनी बंद पाडण्याचे षडयंत्र केले व या कार्यक्षेत्रातील ऊस स्वतःच्या कारखान्याला घेऊन गेले. गेल्या वर्षी करमाळा तालुक्यातील नऊ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप बारामती अ‍ॅग्रोमध्ये झाले आहे.

आता न्यायालयानेसुद्धा सहकाराची बाजू उचलून धरली आहे. कारखान्यासाठी सुरू करण्यासाठी लागणारी रक्कम माजी आमदार नारायण पाटील यांनी भरण्याची तयारी दाखवली आहे. सर्व सभासद त्यांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे आता सुभाष गुळवे यांनी आदिनाथचा नाद सोडून सिन्नरच्या कारखान्याकडे जावे, असा मार्मिक टोलाही गुळवे यांना लगावला आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा एकमेव कारखाना असा होता की ज्या कारखान्याच्या वजन काट्यावर जाऊन ऊस उत्पादक आपल्या उसाचे वजन तपासून पाहू शकत होता. खासगी साखर कारखाने वजन काट्यावर कुणाही शेतकर्‍याला येऊ देत नाहीत. त्यांच्या वजन काट्यात तफावत असल्याच्या अनेक तक्रारी असतात.

एखादा शेतकरी वजन काट्यावर गेला तर त्याला दमदाटी करुन त्याचा वेगळा मार्गाने बंदोबस्त करतात. यामुळे आदिनाथ सहकारी साखर कारखाना सुरू होणे काळाची गरज होती. हा कारखाना सुरू झाला तर इतर कारखान्यांची काटामारी बंद होणार आहे, याची जाणीव खासगी कारखानदारांना असल्यामुळे 'आदिनाथ' बंद पाडण्यासाठी किंवा त्याचे खासगीकरण व्हावे यासाठी साखरसम्राट प्रयत्न करीत होते, मात्र या वजन काटा मारणार्‍या साखरसम्राटांचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, माजी राज्यमंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी मिळून हाणून पाडला, असा विास मार्केट कमिटीचे संचालक देवानंद बागल यांनी व्यक्त केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news