ताडी दुकान बंदीसाठी ‘माकप’तर्फे मोर्चा | पुढारी

ताडी दुकान बंदीसाठी ‘माकप’तर्फे मोर्चा

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा बापूजीनगरातील ताडी विक्रीचे दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे बुधवारी नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबवितानाच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर व जिल्हा सचिव अ‍ॅड. एम. एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली बापूजीनगर येथून हा मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चेकर्‍यांना संबोधित करताना आडम म्हणाले, रसायन मिश्रित विषारी ताडी विक्री केंद्रांना परवाना राज्य उत्पादन शुल्क कडून दिला जातो, ही अत्यंत गंभीर आहे.

सोलापूर हे कामगारांचे शहर म्हणून ओळखले जाते. या शहरात लाखोंच्या घरात कामगार आहेत. या कामगार, कष्टकर्‍यांना व्यसनाकडे आकर्षित करणारी विषारी ताडी विक्री केंद्रे या शहरात सुरू आहेत. बापुजीनगरातही असे केंद्र आहे. यामुळे कित्येक कष्टकर्‍यांचे संसार उध्वस्त झालेले आहेत. विषारी ताडी प्राशन केल्याने गत अनेक वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात कामगार दगावले आहेत. याची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून गंभीर दखल घेणे आवश्यक आहेत. या विक्री केंद्र परिसरात शाळा, प्रार्थनास्थळ, मंदिर व हॉस्पिटल आहेत. हे लक्षात घेता या केंद्राचा परवाना कायम स्वरूपी रद्द करणे अत्यावश्यक आहे.

आंदोलनात नसीमा शेख, युसूफ शेख, रंगप्पा मरेड्डी, अशोक इंदापुरे, शेवंता देशमुख, शकुंतला पाणीभाते, सुनंदा बल्ला, अनिल वासम,अकील शेख, अशोक बल्ला, बालाजी गुंडे, डेव्हिड शेट्टी, शकील आगवाले, महिबूब गिरगांवकर, आसिफ पठाण, गोविंद सज्जन, श्रीनिवास भंडारे, हणमंतू पेद्दी, गोपाळ जकलेर, सुरेश गुजरे आदी सहभागी झाले होते. पोलिसांना आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.

Back to top button