नागपुरात खासगी शाळेतील तब्बल ३८ विद्यार्थी कोरोनाबाधित | पुढारी

नागपुरात खासगी शाळेतील तब्बल ३८ विद्यार्थी कोरोनाबाधित

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपुरात कोरोनाने कहर केला आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली असून रविवारी सुमारे २६२ जण बाधित आढळले. यामध्ये हिंगणा रोडवरील जयताळा भागातील राय इंग्लिश स्कूलमधील तब्बल ३८ विद्यार्थी कोरोनाबाधित निघाले आहेत. शुक्रवारी (दि.१५) या शाळेतील मुलांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली होती. यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

३ जुलैपासून नागपुरात कोरोना बाधितांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. २ जुलै रोजी ९५ बाधितांची नोंद झाली होती. त्यानंतर ३ जुलै रोजी १०५ बाधितांची नोंद झाली. त्यानंतर दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढत असताना रविवार एकदम २६२ कोरोना बाधित निघाले. यात शहरातील १६२ तर ग्रामीणमधील १०० बाधितांचा समावेश आहे. यातच राय इंग्लिश स्कूलमधील तब्बल ३८ विद्यार्थी कोरोना बाधित आढळल्याने खळबळ उडाली.

यानंतर शाळेचे संचालक डॉ.एम.एम.राय यांनी शाळा बंद ठेवणार असल्याचे सांगितले आहे. शाळेतील शिक्षकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सर्व मुलांच्या पालकांना मुलांची आरटीपीसीआर करायला सांगितले आहे. त्यांचे अहवाल निगेटीव्ह आल्यानंतरच शाळेत प्रवेश दिला जाईल, त्यांच्या अभ्यासाचे नुकसान होऊ देणार नाही, असेही राय यांनी सांगितले आहे.  दरम्यान, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी कोणत्याही शाळेची सरसकट तपासणी करण्यात येणार नसून पालकांनी किंवा शाळा संचालकांनी मागणी केल्यास नमुने घेण्यात येतील असे स्पष्ट केले.

हेही वाचा :

Back to top button