गडचिरोली : नक्षल्यांना स्फोटके पुरविणाऱ्या ४ जणांना अटक | पुढारी

गडचिरोली : नक्षल्यांना स्फोटके पुरविणाऱ्या ४ जणांना अटक

गडचिरोली ; पुढारी वृत्‍तसेवा :  नक्षल्यांना स्फोटक साहित्याचा पुरवठा करणाऱ्या चार जणांना अहेरी तालुक्यातील दामरंचा येथील पोलिसांनी भंगारामपेठा गावातून अटक केली. त्यांच्याकडून ३ हजार ५०० मीटर लांबीचे कार्डेक्स वायरचे १० बंडल जप्त करण्यात आले आहेत.

राजू गोपाल सल्ला (वय ३१),रा. आसिफनगर, जि. करीमनगर (तेलंगणा), काशिनाथ ऊर्फ रवी मुल्ला गावडे (२४), रा. भंगारामपेठा ता. अहेरी, साधू लच्चा तलांडी (३०) व मोहम्मद कासिम शादुल्ला रा. आसिफनगर (तेलंगणा) अशी आरोपींची नावे आहेत. यातील छोटू ऊर्फ सिनू मुल्ला गावडे हा आरोपी फरार झाला आहे.

शनिवारी १९ फेब्रुवारी राेजी दामरंचा पोलिस ठाण्यातील पोलिस आणि शीघ्र कृती दलाचे जवान पोलिस उपनिरीक्षक सचिन घोडके यांच्या नेतृत्वात नक्षलविरोधी अभियान राबवीत होते. यावेळी भंगारामपेठा येथून स्फोटक साहित्य ताब्यात घेऊन चार जणांना अटक करण्यात आले. हे चारहीजण तेलंगणा राज्यातून दामरंचामार्गे छत्तीसगडमध्ये कार्डेक्स वायर या स्फोटक साहित्याचा नक्षल्यांना पुरवठा करणार होते.

नक्षलवादी बीजीएल, हँडग्रेनेड, बॉम्ब आणि आयईडी ही स्फोटके तयार करण्यासाठी कार्डेक्स वायरचा वापर करतात. नजीकच्या काही दिवसांत नक्षलवादी या साहित्याद्वारे घातपात घडवून आणण्याच्या तयारीत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी कारवाईत सहभागी पोलिसांचे कौतूक केले असून, नक्षलसमर्थकांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Back to top button