महाराष्ट्र अनलॉकच्या दिशेने, परंतु मास्कमुक्ती नाही : विजय वडेट्टीवारांची स्पष्टोक्ती | पुढारी

महाराष्ट्र अनलॉकच्या दिशेने, परंतु मास्कमुक्ती नाही : विजय वडेट्टीवारांची स्पष्टोक्ती

नागपुर, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात मुंबईमध्ये कोरोना संक्रमणाला सुरुवात झाली होती. परंतु आता कोरोनाची परिस्थिती निवळत आहे आणि महाराष्ट्र अनलॉकच्या दिशेने वाटचाल करीत असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

कोरोनाचे निर्बंध शिथील होत आहेत. परंतु मास्क मुक्ती मात्र होणार नाही, असे त्यांनी सांगितले. मुंबईनंतर राज्यभर कोरोनाचे संक्रमण वाढले होते. मुंबईत रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे मुंबईत निर्बंध शिथिल करण्यात आले. टप्याटप्याने राज्याच्या इतरही भागांत ही कार्यवाही करण्यात येणार आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.

या महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्र पुर्णत: अनलॅाक होण्याची शक्‍यता आहे. राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहे. महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट नियंत्रणात येत आहे. नागपूरात मात्र आठवडाभरासाठी निर्बंध तसेच राहणार आहेत. अनलॅाक होत असताना मास्कमुक्त महाराष्ट्र होणार नाही, प्रत्येकाने मास्क वापरने गरजेचे आहे.

अनलॅाक करताना चौथ्या लाटेचीही चिंता आहे. चौथी लाट ओमीक्रॅान पेक्षा जास्त वेगाने वाढण्याची शक्‍यता आहे.  त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे, असे मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले.

नागपुरात अधिवेशनाचा निर्णय

पुढे बोलताना वडेट्टीवार म्‍हणाले, विधिमंडळ समिती नागपुरात येऊन गेली. पण अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात घ्यावे की नाही, याबद्दल समितीचा निर्णय अद्याप झालेला नाही. येत्या १५ तारखेला कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे. त्यावेळी याबद्दल निर्णय घेण्यात येणार आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

हेे ही वाचलं का 

Back to top button