नागपुरात पुन्हा 'न्यूड डान्स', उमरेड नंतर मौदा तालुक्यातील लाजिरवाणा प्रकार समोर - पुढारी

नागपुरात पुन्हा 'न्यूड डान्स', उमरेड नंतर मौदा तालुक्यातील लाजिरवाणा प्रकार समोर

नागपूर : पुढारी वृत्तसेवा 

नागपूर जिल्ह्याच्या ग्रामिण भागात अश्लिलतेचा कळस पार करून सादर केलेल्या न्यूड डान्स प्रकरणी पोलिसांनी आतापर्यत ११ जणांना अटक केली आहे. या विषयी अधिक माहिती अशी की, नागपूर जिल्ह्यात न्यूड डान्सचा लाजिरवाणा आणि संतापजनक प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. उमरेड तालुक्यातील ब्राह्मणी गावात घडलेल्या अशाच प्रकाराच्या घटनेचा पोलीस तपास पूर्ण झालेला नसताना आता मौदा तालुक्यातील भूगावमध्ये असाच प्रकार समोर आला आहे.

या प्रकारानंतर पोलिसांनी मौदा पोलीस स्थानकात आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली असून, इतरांचा शोध सुरु आहे. नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालवणारे असे प्रकार समोर येत आहेत. अश्लिलतेची सर्व सीमा ओलांडून शेकडो प्रेक्षकांच्या उपस्थितीत अत्यंत किळसवाणा आणि संतापजनक प्रकार सुरू होता. महाराष्ट्राची नृत्य परंपरा असलेल्या लावणीच्या नावाखाली भुगावमध्ये काहींनी “लावणी डान्स हंगामा” या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली मंचावर अक्षरशः ‘नंगा नाच’ आयोजित केला होता.

मंचावर नृत्याच्या नावाखाली स्त्री आणि पुरुष नर्तक अश्लील चाळे करत होते. काही दिवसांपूर्वी नागपूरच्या ब्राम्हणी गावाप्रमाणेच भुगावमध्येही दिवसा शंकरपाट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर संध्याकाळी लावणी डान्स हंगामा असा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करत यावेळी हा किळसवाणा प्रकार करण्यात आला आहे. या घटनेनंतर मौदा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याआधी उमरेड तालुक्यातील ब्राह्मणी न्यूड डान्सचा जो प्रकार घडला होता. त्याचा तपास करण्यासाठी नागपूर ग्रामीण पोलिसांनी महिला पोलीस उपअधीक्षकांच्या नेतृत्वात एक पथक तयार केलं असून, आतापर्यंत एकूण ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ब्राह्मणी गावात आयोजित करण्यात आलेल्या न्यूड डान्स प्रकरणी ॲलेक्स उर्फ प्रबुद्ध बागडे या ऑर्केस्ट्रा संचालकाला ही अटक झाली.

तो अनेक पुरुष आणि महिला नर्तकांना घेऊन अनेक ठिकाणी “अलेक्स जुली के हंगामे” या नावाने रेकॉर्डिंग डान्सचे आयोजन करतो असे ही तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे आता समोर आलेल्या प्रकारात आणि उमरेडमध्ये अशा दोन्ही ठिकाणी कार्यक्रमासाठी आयोजकांनी पोलिसांची परवानगी घेतली नव्हती असे समोर आले आहे. त्यामुळे त्यांना असे लाजिरवाणे प्रकार करताना पोलिसांची भिती नसल्याचं दिसून येत आहे.

Back to top button