डोंबिवली : इन्स्टाग्रामवरची मैत्री पडली महागात | पुढारी

डोंबिवली : इन्स्टाग्रामवरची मैत्री पडली महागात

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : इन्टाग्रामवर मैत्री झालेल्या कल्याणमधील एका तरुणाने डोंबिवलीकर असलेल्या आपल्या मित्राला प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा व्यक्त केली. डोंबिवलीच्या मित्राने कल्याणच्या मित्राला ठाकुर्ली रेल्वे स्थानक भागात मंगळवारी संध्याकाळी भेटण्यासाठी बोलविले. भेटीच्या वेळी कल्याणच्या मित्राने डोंबिवलीच्या मित्राला त्याची दुचाकी एक फेरा मारण्यासाठी मागितली. दुचाकीचा ताबा मिळताच कल्याणचा हा मित्र दुचाकी घेऊन फरार झाला. डोंबिवलीकर मित्राने टिळकनगर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे.

करण सागवेकर (18, रा. शिव अमृत चाळ, सरोवर नगर, डोंबिवली-पश्चिम) असे तक्रारदार तरुणाचे नाव आहे. तर इन्स्टाग्रामवरील मित्र अनिकेत वाडेकर (19) असे फरार आरोपीचे नाव आहे. तक्रारदार करण आणि अनिकेत हे इन्स्टाग्रावरील एकमेकांचे मित्र आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून ते एकमेकांच्या संपर्कात आहेत. दोघांनी एकमेकांचा विश्वास संपादन केला होता. मंगळवारी करण आपली दुचाकी घेऊन कार्यालयात गेला होता. यावेळी अनिकेत याने करणला आपण प्रत्यक्ष भेटून गप्पा मारू, असे सांगितले.

करण याने त्याला मंगळवारी संध्याकाळी ठाकुर्लीच्या रेल्वे स्थानक भागात भेटण्यासाठी बोलविले. दोघा मित्रांची भेट झाली. अनिकेत याने करण याला तुझी दुचाकी खूप छान आहे, तुझी दुचाकी मला चालवायला दे, मी एक फेरा मारून येतो, असे तो म्हणाला. बोलण्यावर विश्वास ठेऊन करण याने अनिकेत याला दुचाकीचा ताबा दिला. दुचाकी घेऊन अनिकेत फेरा मारुन येईल म्हणून करण वाट पाहत राहिला. अर्धा तास झाला तरी अनिकेत दुचाकी घेऊन येत नाही म्हणून करण अस्वस्थ झाला. त्याने ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसरात जाऊन अनिकेत दुचाकीवरुन पडला आहे. त्याच्या दुचाकीला अपघात झाला म्हणून तो आला नाही की काय असे तर्क काढत फिरत राहिला. दोन तास फिरुनही अनिकेत आढळून आला नाही. अनिकेत याने आपली फसवणूक केल्याची खात्री पटल्यानंतर करणने टिळकनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे.

Back to top button