ठाणे : प्लास्टिकच्या फुलांमुळे फुल उत्पादक संकटात | पुढारी

ठाणे : प्लास्टिकच्या फुलांमुळे फुल उत्पादक संकटात

ठाणे : श्रद्धा कांदळकर गणेशोत्सवासाठी बाजारात ग्राहकांची लगबग वाढली आहे. सजावटीसाठी वापरल्या जाणार्‍या चिनी आणि प्लॅस्टिकच्या फुलांनी बाजारपेठेला विळखा घातला आहे. आकर्षक रंगसंगती, कमी किंमत आणि दीर्घकाळ टिकत असल्याने ग्राहक वर्ग या फुलांकडे आकर्षिला जात असून, खर्‍या फुलांपेक्षा या फुलांची मागणी अधिक पटीने वाढली आहे. यामुळे लॉकडाऊननंतर बराच तोटा सोसून बाजारपेठेत स्थिरस्थावर होण्याच्या प्रयत्नात असणार्‍या फुल उत्पादकांचा फुलशेतीचा व्यवसाय तोट्यात जाण्याची चिन्हे असून, या प्लास्टिकच्या फुलांमुळे फुल उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.

गेल्या दोन वर्षात कोरोना, लॉकडाऊन आणि त्यामुळे लावण्यात आलेले विविध निर्बंध यामुळे जिल्ह्यासह राज्यातील मंदिरे बंद होती. त्यामुळे भाविकांना कळसाचे दर्शन घेऊन परतावे लागत होते. तर निर्बंधांमुळे दोन वर्षे सण उत्सवही सध्या पद्धतीने साजरे करण्यात आले होते. त्यामुळे फूल उत्पादक आणि फूल विक्रेत्यांना मोठ्या आर्थिक तोट्याला सामोरे जावे लागले होते. अनेक फूल उत्पादक आणि फूल विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली होती.

यंदा गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरा होत आहे. मात्र बाजारपेठेत स्थिरस्थावर होण्याच्या प्रयत्नात असणार्‍या फुल उत्पादक शेतकर्‍यांसमोर प्लास्टिक फुलांचे विघ्न उभे राहिले आहे. दोन वर्षात कोरोना व चीनी बनावटीच्या प्लास्टीक फुलांच्या आयातीमुळे बाजारात सर्वच फुलांच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.फुलांचे दर गडगडले

गणरायाच्या पूजेसाठी जास्वंद, झेंडू, गुलाब, जाई, जुई, मोगरा, अबोली, या फुलांना तर सजावटीसाठी अस्टर, शेवंती, गॅलार्डिया इत्यादींच्या सुट्या फुलांना व लॅडओलस, गुलाब, जरबेरा, कानेंशन, ऑर्केड्स, अ‍ॅन्थुरियम या दांड्याच्या फुलांना प्रचंड मागणी असते. मात्र ही सर्व फुले चीनमधून प्लास्टिक स्वरूपात कृत्रिम फुले म्हणून मोठ्या प्रमाणात आयात झालेली आहेत. खर्‍या फुलांपेक्षा कमी किमतीत आणि जास्त काळ टिकणारी फुले म्हणून ग्राहकही या फुलांकडे आकर्षित होत आहेत. याचा सर्वाधिक फटका फूल उत्पादक शेतकर्‍यांना बसून बाजारात फुलांचे दर गडगडले आहेत.

Back to top button