डोंबिवली एमआयडीसीत 16 लाखांच्या ऐवजाची चोरी | पुढारी

डोंबिवली एमआयडीसीत 16 लाखांच्या ऐवजाची चोरी

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी भागातील बंद असलेल्या एका बंगल्याच्या खिडकीच्या जाळ्या लोखंडी कटावणीने वाकवून घरात प्रवेश करुन चोरट्याने घरातील 16 लाख रुपये किमतीचे हिरे, सोन्याचे दागिन्यांचा ऐवज गुरुवारी रात्री चोरुन नेला. एमआयडीसी हद्दीत अनेक दिवसांपासून बंद असलेल्या चोर्‍या पुन्हा सुरू झाल्याने रहिवाशांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

यातील तक्रारदार प्रजना राय शेट्टी हे मिलाप नगरमधील आरएल 111 या यश बंगल्यात राहतात. प्रजना या सिटी रुग्णालयात व्यवस्थापक म्हणून काम करतात. त्या कामावर गेल्या असताना चोरट्यांनी त्यांच्या बंद बंगल्याच्या पाठीमागील बाजुकडील खिडकीच्या जाळ्या धारदार कटावणीने वाकवल्या. तेथून घरात प्रवेश केला. किमती ऐवज, पैशांसाठी घरातील सामानाची नासधूस केली. तेथे काही आढळले नाही म्हणून चोरट्याने तक्रारदार प्रजना यांची मुलगी सलोनी हिच्या बेडरूम मधील लाकडी कपाटातल्या कुलुपबंद खणात ठेवलेले सोने, हिर्‍याचे 16 लाख रुपये किमतीचे हिरे, सोन्याचे दागिने चोरुन नेले.

प्रजना शेट्टी गुरुवारी सकाळी घरी आल्या त्यावेळी त्यांना घराच्या पाठीमागील खिडकी तोडलेली दिसली. घरात सामानाची फेकाफेक केलेली, तसेच कपाट उघडे असल्याचे दिसले. घरातील किमती ऐवज चोरीला गेल्याने प्रजना शेट्टी यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. एमआयडीसीच्या निवासी विभागात नियमितपणे चोर्‍याघरफोड्या होत असतात.पोलिसांनी गस्त वाढविल्याने चोर्‍या गेल्या दोन महिन्यांपासून बंद झाल्या होत्या. चोर्‍या पुन्हा वाढल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Back to top button