ठाणे : शिक्षक भरतीचे पवित्र पोर्टल वर्षभरापासून बंद | पुढारी

ठाणे : शिक्षक भरतीचे पवित्र पोर्टल वर्षभरापासून बंद

ठाणे; पुढारी वृत्तसेवा :  शिक्षक भरतीचे शिक्षण संस्थांचे अधिकार काढून घेत तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय आजही कायम आहे. मात्र शिक्षक भरतीचे पवित्र पोर्टलच गेली दोन वर्षे बंद आहे.

परिणामी, राज्यात जवळपास 20 टक्के शिक्षकांची पदे रिक्तच राहिली आहेत. इंग्रजी, गणितासारख्या महत्वाच्या विषयांचे शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांची पाटी कोरी राहण्याची भीती आहे. ठाणे जिल्ह्याचा विचार करता, जवळपास 1 हजाराहून अधिक माध्यमिक
शाळा आहेत. या शाळांमध्ये शिक्षक संख्या जवळपास 10 हजार शिक्षकांची पदे आहेत. यापैकी बरेच शिक्षक दरम्यानच्या काळात निवृत्त झाल्याने 20 टक्के पदे रिक्त आहेत. सध्या शिक्षकांचा पॅटर्नही सरकारने बदलला आहे.

पूर्वी 1 तुकडी दीड शिक्षक असे समीकरण होते. त्यामुळे पाचवी ते दहावी वर्गांसाठी 10 शिक्षक मिळायचे. मात्र आताच्या धोरणानुसार 1 तुकडी 1 शिक्षक एवढेच शिक्षक मिळतात. त्यामुळे 10 वरून ही पदे 6 वर आली आहेत. त्यात निवृत्त झालेल्या शिक्षकांच्या ऐवजी नवीन शिक्षक भरताना पवित्र पोर्टलवर त्याची नोंद करून शिक्षण विभागच भरती प्रक्रिया राबवणार असल्याचे धोरण अवलंबण्यात आले. मात्र, हे पोर्टलच 2 वर्षे बंद ठेवून या शिक्षक भरतीलाच ब्रेक दिला आहे. परिणामी, शिक्षकांची 20 टक्के पदे रिकामीच आहेत. याचा परिणाम
माध्यमिक शिक्षणावर होत आहे.

राज्यात  शिक्षकांची रिक्त असलेली पदे 25 हजाराहून अधिक आहेत. आता शिक्षकच नाहीत तर मुलांचे शिक्षण कसे, असा प्रश्न
उपस्थित झाला आहे. ठाकरे सरकारच्या कालावधीत शिक्षण खाते काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्याकडे होते. पहिले दोन वर्षे कोरोना
मध्ये गेली. आणि शाळा सुरु होताच आता सत्तांतर झाले. मात्र नवे मंत्री येण्यास 39 दिवस गेले. आता नवे मंत्रिमंडळ अस्तित्वात आले आहे. आता या सरकारने शिक्षणाच्या महत्वाच्या प्रश्नाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शिक्षक भरती न झाल्यास शिक्षकांचा मोठा प्रश्न उभा
राहणार आहे.

ग्रामीण भागातील शाळांवर परिणाम

एका बाजूला टीईटी घोटाळा प्रकरणामुळे जिल्ह्यातील 500 हुन अधिक शिक्षकांची पदे धोक्यात आली आहेत. तर दुसरीकडे पोर्टल
बंद असल्याने शिक्षक भरती बंद आहे. याचा मोठा परिणाम ग्रामीण भागातील शाळांना सहन करावा लागत आहे. अलीकडेच राज्य सरकारने एमपीएससी मार्फत शिक्षक भरती होणार असल्याचेही सांगितले होते. मात्र याबाबतही कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. परिणामी सरकारच्या धरसोड धोरणामुळे शिक्षक भरती प्रक्रिया पेचात पडल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण शिक्षकांविना सुरु आहे

Back to top button