ठाणे : मलंगगड रस्त्यावरील खड्ड्यांमुळे टेम्पो उलटला; कुणाल पाटलांचा जनआंदोलनाचा इशारा (व्हिडिओ) | पुढारी

ठाणे : मलंगगड रस्त्यावरील खड्ड्यांमुळे टेम्पो उलटला; कुणाल पाटलांचा जनआंदोलनाचा इशारा (व्हिडिओ)

नेवाळी (ठाणे) : पुढारी वृत्तसेवा :  कल्याण पूर्वेतील वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा असलेल्या कल्याण- मलंगगड रस्त्याचे खड्ड्यांमध्ये रूपांतर झाले आहे. द्वारली गावापासून ते भाल गावापर्यंत खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. मलंगगड रोडवरील द्वारली गावाजवळील एका टेम्पोच्या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी समोर आणला आहे. तसेच प्रशासन पत्रव्यव्हाराकडे दुर्लक्ष करत असल्याने जनआंदोलन करण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे.

कल्याण मलंगगड रस्ता हा वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. या मार्गावरून चाकरमानी अंबरनाथ, नवी मुंबई औद्योगिक कामासाठी जातात. या मुख्य रस्त्यावर अनेक महाविद्यालय आणि शाळादेखील आहेत. मात्र, या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. रस्त्यावरून वाहन नाही तर नागरिक देखील पायपीट करू शकत नाहीत अशी अवस्था या रस्त्याची झालेली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.

गुरुवारी (दि.१४) रोजी झालेल्या एका तीनचाकी टेम्पोच्या अपघाताचा व्हिडिओ सीसीटीव्हीद्वारे माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी समोर आणला आहे. त्यामुळे अशा गंभीर प्रकारच्या अपघातांच्या मालिका सुरु असताना प्रशासन मात्र, ढिम्म असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रशासनाने लोकप्रतिनिधींच्या पत्रांकडे आणि मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी जन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

कल्याण- मलंगगड रस्त्यावर खड्ड्यांमुळे सर्वाधिक बळी गेले आहेत. या बळींमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वाधिक सहभाग आहे. शिक्षणासाठी घराबाहेर गेलेल्या मुलांचे जीव जात असतानाही प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याने आता नागरिक देखील संतापले आहेत. त्यामुळे आता कुणाल पाटील यांच्या इशाऱ्यानंतर केडीएमसी प्रशासन याकडे किती गांभीर्याने लक्ष देत हेच पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button