नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा
भऊर येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेत रोजंदारीवर कार्यरत असताना खातेदारांच्याच पैशाची 'सफाई' करणार्या संशयित भगवान ज्ञानदेव आहेर (रा. लोहोणेर) याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी गुरुवारी (दि. 14) नाशिकला पत्रकार परिषदेत या प्रकरणाची माहिती दिली.
भऊर शाखेत सफाई कर्मचारी असलेल्या आहेरने 2016 पासून 32 खातेदारांचा विश्वास संपादन करीत त्यांच्या पीककर्ज तसेच बचत खात्यावरील रकमा परस्पर स्वीकारून लांबवल्या. या पद्धतीने तब्बल एक कोटी 50 लाख 73 हजार रुपयांची फसवणूक केली. बँकेचे क्षेत्रिय प्रबंधक श्रीराम भोर यांनी देवळा पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली. याची कुणकुण लागल्यानंतर संशयित आहेर फरार झाला होता. देवळा पोलिसांनी गुरुवारी (दि. 14) दुपारी सोग्रस फाटा (ता. चांदवड) येथे सापळा रचून त्याला अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिलीप लांडगे यांनी दिली. आहेरने बँकेतून मुदतठेव पुस्तकातून 27 पावत्याही चोरल्या होत्या. त्यावर स्वत: नोंद करून तो खातेदारांना देत आश्वस्त करीत होता.