भुयारी मेट्रो यामुळे खर्च दुपटीवर | पुढारी

भुयारी मेट्रो यामुळे खर्च दुपटीवर

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : ठाणे जिल्ह्यात चार मेट्रो प्रकल्प आकाराला येत आहेत. घाटकोपर ते कासारवडवली, कल्याण ते भिवंडी,कल्याण ते तळोजा आणि चौथा बोरिवली ते मिरारोड असे चार प्रकल्प आकाराला येत आहेत. हे सर्व मेट्रो प्रकल्प मुख्य मेट्रोला जोडले जाणार आहेत. त्यामुळे दळणवळण सुलभ होणार आहे. मात्र भिवंडीच्या भुयारी मेट्रोमुळे खर्चात दुप्पट वाढ झाली आहे त्यामुळे या मेट्रोचे अर्थकारण बिघडण्याची भीती आहे.

कल्याण ते भिवंडी या मेट्रोला नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. मात्र मोठ्या प्रमाणात बांधकाम फटका बसत असल्याने ही मेट्रो भुयारी करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. यात पूर्वीच्या खर्चापेक्षा दुपटीने वाढ होणार असून जवळपास 1 हजार 427 कोटींनी हा खर्च वाढला आहे. कल्याण नाका ते साईबाबा मंदिर टेमघर अशी ही पाचव्या मेट्रोची रचना आहे. एकूण मेट्रोची लांब 25 किमी असून पूर्वीचा खर्च 8 हजार 416 कोटी होता.

आता हा खर्च 1 हजार 427 कोटींनी वाढला आहे. 12 किमीचे काम सध्या सुरु झाले आहे. हे काम 70 टक्के पूर्ण झाले आहे. भुयारी मार्गामुळे गोपाळ नगर स्थानक रद्द होणार आहे. भुयारी मेट्रो ज्या भागात आहे तिथे 342 निवासी संकुले, 1,500 अनिवासी संकुले आहेत. ही संकुले निष्कासित करावी लागू नये म्हणून भुयारी मार्गाचा प्रस्ताव आहे. या मेट्रोच्या रचनेमुळे भिवंडी शहर ठाणे,मुंबईला सरळ जोडले जाणार आहे.

ठाणे पलीकडील स्ते मार्गावरील भार कमी करण्यासाठी ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो मार्गाची घोषणा करण्यात आली होती. ही उन्नत मार्गिका ठाण्यातील कापूरबावडी येथून ठाणे- भिवंडी रस्त्याने भिवंडी शहरात राजीव गांधी चौक, भिवंडी येथून कल्याण रस्त्याने राजनोली ते दुर्गाडीपर्यंत व त्यापुढे कल्याण शहरातून कल्याण शीळरोड मार्गे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयापर्यंत प्रस्तावित आहे.

दोन टप्प्यांत होणार्‍या या कामातील पहिल्या 12.7 किलोमीटर लांबीचे काम सुरू आहे. तर दुसर्‍या टप्प्यात भिवंडी ते कल्याणमधील भिवंडी शहरात राजीव गांधी चौक ते साईबाबा मंदीर, टेमघर या सुमारे 3 किलोमीटर अंतरात मोठ्या प्रमाणात पुनर्वसन व पुनर्वसाहतीची कामे करावी लागणार आहेत. यात सुमारे 1,597 बांधकामे निष्कासित करावी लागणार आहेत. तर यासाठी रस्ता रूंदीकरणाकरिता 18 हजार चौ मीटर जागेचे भूसंपादन करावे लागणार आहे. त्यामुळे या टप्यातील स्थापत्य कामास अजूनही सुरुवात झालेली नाही.

निष्कासन आणि भूसंपादन यामुळे ही प्रक्रिया वेळखाऊ आणि खर्चिक ठरू शकते. त्यामुळे सल्लागारांच्या अहवालानंतर हा मार्ग भूमिगत करण्याची तयारी एमएमआरडीएने सुरू केली आहे.

असा असणार भुयारी मार्ग

भिवंडी शहरामधील रस्ते अरूंद असल्याने या ठिकाणी मेट्रोचे भूमिगत बांधकाम केल्यास शहरातील पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या समस्या कमी होतील. यात धामणकर नाका ते राजीव गांधी चौक या सुमारे 1.5 किलोमीटर लांबीतील रस्त्याचे रूंदीकरण करावे लागेल.

धामणकर नाका येथे भुयारी मार्ग, सेवा रस्ता, उन्नत मेट्रो, रॅम्प, ओपन कट रॅम्पसाठी रस्ता रूंद करावा लागेल. या भूमिगत मार्गिकेत राजीव गांधी चौक येथे ओपन कट रॅम्पद्वारे उन्नत मेट्रो मार्गिका भूमिगत होऊन कल्याणच्या दिशेने कल्याण रस्त्याला समांतर उजव्या बाजूस साईबाबा मंदिरासमोर मोकळया जागेत ओपन कट रॅम्पद्वारे उन्नत होऊन उन्नत टेमघर मेट्रो स्थानकास मिळेल. पुढे ही मार्गिका कल्याणपर्यंत उन्नत असेल.

Back to top button