Solapur/Malinagar : पिन निघाल्याने ट्रॅक्टरची ट्रॉली थेट पोलीस चौकीत; मोठा अनर्थ टळला | पुढारी

Solapur/Malinagar : पिन निघाल्याने ट्रॅक्टरची ट्रॉली थेट पोलीस चौकीत; मोठा अनर्थ टळला

माळीनगर; पुढारी वृत्तसेवा

माळीनगरहून टेंभुर्णीच्या दिशेने जात असणाऱ्या ट्रॅक्टरला दोन मोकळे ट्रेलर जोडले होते. त्यावेळी अचानक ट्रेलरची पिन निघाल्याने ट्रॅक्टर तसाच पुढे गेला. याबाबत चालकाला काहीच लक्षात आले नाही. आणि ट्रॉली थेट माळीनगर पोलीस चौकीत घुसली. या दुर्घटनेत एक भाजी विक्रेता महिला जखमी झाली असून, विजेच्या वायरींसह टेलिफोन आणि टीव्हीच्या केबल तुटल्या. याशिवाय पोलीस चौकीचे कंपाऊंड व बोर्डचेही नुकसान झाले आहे. (Solapur/Malinagar)

या घटनेत रस्त्याकडेला बसून भाजीपाला विक्री करणारी महिला थोडक्यात बचावली. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पोलीस प्रशासन व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे निर्बंध व नियंत्रण नसल्यानेच असे प्रकार घडत असल्याची नागरिकांत चर्चा आहे.

पोलीस चौकीसमोर असणाऱ्या विजेच्या ट्रान्सफॉर्मरला हे ट्रेलर धडकले असते तर मोठी दुर्घटना घडली असती. माळीनगरचा आठवडा बाजार सोमवारी पोलीस चौकीच्या परिसरातच भरतो. त्यादिवशी ही घटना घडली असती तर मोठी जीवितहानी झाली असती.त्यामुळे यापुढे येथे आठवडा बाजार भरू देणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले. (Solapur/Malinagar)

ऊसाच्या अतिवजनाने ट्रेलरचे टायर रस्त्यावरून जाताना फुटत असल्याचे या परिसरात दिसून येते. त्यामुळे अनेकदा उसाने भरलेले ट्रेलर रस्त्यावरच आडवे झाल्याचे पहावयास मिळत आहे.

हे ही वाचा :

Back to top button