महाराष्ट्रातही 'इंग्लिश नजराणा' आता गोव्याच्या दरानेच मिळणार; आयात कर १५० टक्क्यांवर | पुढारी

महाराष्ट्रातही 'इंग्लिश नजराणा' आता गोव्याच्या दरानेच मिळणार; आयात कर १५० टक्क्यांवर

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

बनावट परदेशी मद्याला आळा घालण्यासाठी तसेच इतर राज्यांच्या बरोबरीने महाराष्ट्रातही परदेशी मद्याचे दर समान राहावेत, या उद्देशाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने परदेशी मद्यावरील आयात करात १५० टक्क्यांनी कमी केला आहे. यापूर्वी ३०० टक्के आयात कर होता. आयात करात सूट दिल्यामुळे आता परदेशी मद्य स्वस्त झाले आहे.

गोवा, दिल्ली आणि इतर काही राज्यांच्या तुलनेने महाराष्ट्रात परदेशी मद्याच्या किमती अधिक आहे. राज्यात गेल्या काही महिन्यांमध्ये बनावट मद्य विक्रीचे प्रमाण वाढले आहे. बनावट मद्य हे मद्यपीच्या प्रकृतीला हानीकारक असतेच, शिवाय राज्य उत्पादन शुल्काच्या महसुलातही घट होते.

शेजारच्या राज्य कमी किंमत असल्यामुळे तिकडून चोरून दारू आणली जात असल्यामुळे ती कमी किमतीमध्ये येथे विक्री केली जात आहे. यामुळे राज्याला १५० ते १७५ कोटींपर्यंत मिळणारा महसूल अलीकडे १०० कोटीवर आला आहे.

राज्य सरकारच्या महसुलात वाढ होण्यासाठी परदेशी मद्याच्या आयतीवरील १५० टक्‍क्‍यांपर्यंत सूट देण्याच्या निर्णयामुळे राज्याचा महसूल २५० कोटींपर्यंत जाईल, असा दावा राज्य उत्पादन शुल्क विभाग आयुक्त कांतीलाल उमाप यांनी केला आहे.

या निर्णयामुळे मद्याच्या किंमती इतर राज्यांच्या बरोबरीने येतील, शिवाय मद्य स्वस्त झाल्याने विक्रीतही वाढ होऊ शकते,असेही उमाप म्हणाले.

Back to top button