सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधित संख्येत वाढ | पुढारी

सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधित संख्येत वाढ

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यांपासून स्थिर असलेल्या अडीच-तीनशेच्या कोरोना संख्येत मंगळवारी अचानक वाढ झाली. आज नव्याने 419 जणांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच चौघांचा मृत्यू झाला आहे. शहरामध्ये मात्र केवळ दहा बाधितांची नोंद झाली, तर एकाही मृत्यूची नोंद शहरामध्ये झाली नाही. आज उपचार घेऊन 386 जण घरी परतले.

जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर, बार्शी आणि सांगोला या तालुक्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या कायम राहत आहे. माळशिरस तालुक्यामध्ये तब्बल 114 कोरोना बाधितांची नोंद झाली. सांगोला 66, पंढरपूर तालुक्यामध्ये 87 बाधितांची तर बार्शी तालुक्यामध्ये 51 तर माढा तालुक्यामध्ये 44 बाधितांची नोंद झाली. महिनाभरापासून ग्रामीण भागातील कोरोना बाधितांचा आकडा चारशेच्या आसपास राहत आहे.प्रशासनाकडून मात्र या भागामध्ये कोरोनाविषयक नियमांची अंमलबजावणी होत नाही. शासकीय आदेश कागदावरच राहत असल्यामुळे येथील बांधिताची संख्या कायम राहत आहे.

जिल्ह्यातील 10 हजार 20 जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील 9 हजार 611 जणांचे रिपोेर्ट हे निगेटिव्ह आले, तर 409 जणांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले. उपचार घेवून बरे झालेल्या ग्रामीण भागातील 379 जणांना घरी सोडण्यात आले. अजूनही दोन हजार 431 बाधितांवर विविध रूग्णालयामध्ये उपचार चालू आहेत.

शहरामध्ये केवळ दहा कोरोना बाधितांची नोंद झाली.शहरामध्ये एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. शहरातील बाधित रूग्णाची संख्या ही सातत्याने कमी राहत आहे. 1 हजार 694 जणांच्या तपासणीमध्ये 10 जणांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह तर एक हजार 684 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. शहरातील 98 बाधितांवर विविध रूग्णालयामध्ये उपचार सुरू असून उपचार घेवून बरे झालेल्या 7 जणांना घरी पाठवण्यात आले आले.

Back to top button