Madandas Devi : करमाळा येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहकार्यवाहक मदनदास देवी यांचे निधन | पुढारी

Madandas Devi : करमाळा येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहकार्यवाहक मदनदास देवी यांचे निधन

करमाळा; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहकार्यवाहक मदनदास देवी यांचे आज (सोमवार, दि. २४) पहाटे ५ वाजता बंगळुरू येथे निधन झाले. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते करमाळा येथील मूळ रहिवासी आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी संघटनमंत्री म्हणून देखील त्यांनी कार्य केले आहे.

ते दिल्ली, नागपूर तसेच विविध ठिकाणाच्या संघ कार्यालयातून भारतभ्रमण करत संघांचे पूर्णवेळ काम करत होते. गेल्या वर्षापासून हरीद्वार येथील पालमपूरच्या आयुर्वेद संस्थेत पंचकर्म आणि इतर थेरपीद्वारे त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. त्यामुळे आजारपणामुळे ते घरीच होते.

राष्ट्रसेवेसाठी लहानपणापासूनच मदनदास देवी यांनी आपलं सर्वस्व वाहिले होते. आजीवन ब्रह्मचारी राहीलेले मदनदास देवी यांनी संघ कार्यासाठी संपूर्ण जीवन व्यतीत केले. आयुष्यात ७० वर्षे त्यांनी संघाच्या प्रचार आणि प्रसारासाठी काम केले. संघाकडून ते भाजपचे राजकीय निरीक्षक म्हणूनही कार्यरत होते.

त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच करमाळ्यातील त्यांच्या नातेवाईकांसह शहरातील सामाजिक पटलावर दुःखाची छाया पसरली आहे. स्व. मदनदास यांच्या पाठीमागे एक भाऊ, दोन भगिनी, पुतणे, पुतणी, भाचे असा परिवार आहे. ते येथील सुवर्णव्यवसायिक व स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष  खुशालदास देवी यांचे धाकटे बंधू होते. मंगळवारी (दि. २५) सकाळी १० वाजता पुणे येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Back to top button