सोलापूर : बेरोजगार तरुणांंना कंत्राटी शिक्षक म्हणून संधी द्या; शिक्षक संघटनेच्या पदाधिकार्‍यांकडून निघतोय सूर | पुढारी

सोलापूर : बेरोजगार तरुणांंना कंत्राटी शिक्षक म्हणून संधी द्या; शिक्षक संघटनेच्या पदाधिकार्‍यांकडून निघतोय सूर

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त असलेल्या जागेत सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या निर्णयाला शिक्षक संघटनेकडून विरोध होत आहे. शिक्षक होण्यासाठी पात्र असलेल्या बेरोजगार तरुणांना शिक्षक म्हणून संधी द्यावी, असा सूर जिल्ह्यातील विविध प्राथमिक संघटनेच्या पदाधिकार्‍यांकडून निघत आहे.

जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकाची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती देण्याचा आदेश शासनाने दिला. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात 500 सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती होणार आहे. या नियुक्तीला शिक्षकांकडून विरोध होत आहे. शिक्षक भरतीस प्रक्रियेस विलंब होत आहे. पवित्र प्रणाली मार्फत शिक्षक भरती होईपर्यंत कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. या नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा 70 वर्ष असणार आहे. महिन्याला वीस हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. जिल्ह्यात प्राथमिक शिक्षण विभागात सुमारे 900 पदे रिक्त आहेत. त्यातील अत्यावश्यक पदावर सुमारे 500 शिक्षकांची नियुक्ती होणार आहे.

राज्यात बेकारी खूप आहे. त्यामुळे सरकारने सुशिक्षित बेकार, डी.एड्., बी.एड्. धारकांना शिक्षक म्हणून तात्पुरत्या नियुक्त्या द्याव्यात. सेवानिवृत्त असलेल्यांना पेन्शन आहे. तरीही त्यांना 20 हजार देण्याचा निर्णय घेतला आहे. पण, बेरोजगारांना आठ हजार रुपये दिले तरी चालतील. यातून सरकारचे पैसेही वाचतील व बेकारांना कामही मिळेल.
– म. ज. मोरे, जिल्हाध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघ (संभाजीराव थोरात गट)

खेड्यापाड्यात हजारो डी.एड्., बी.एड्. युवक संधीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र नवीन शिक्षण सेवक भरतीपासून पळवाट काढण्यासाठी सेवानिवृत्त शिक्षकांना मानधनावर नियुक्त करण्याचा निर्णय दुर्दैवी आहे. सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या नोकरीच्या संधी हिरावणार्‍या या निर्णयाचा फेर विचार व्हावा. युवकांना रिक्त पदावर संधी मिळावी.
– सुरेश पवार, शिक्षक नेते, प्राथमिक शिक्षक समिती.

Back to top button