आषाढी एकादशी सोहळा : पंढरपुरात प्रासादिक साहित्यांनी बाजारपेठ फुलली | पुढारी

आषाढी एकादशी सोहळा : पंढरपुरात प्रासादिक साहित्यांनी बाजारपेठ फुलली

पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा : आषाढी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा गुरुवारी (दि. 29) होत आहे. संतांच्या पालख्या, दिंड्या पंढरीत दाखल झाल्या आहेत. यामुळे पंढरपूर भाविकांनी गजबजले आहे. त्याचबरोबर आषाढीनिमित्त प्रासादिक साहित्यांची दुकानेदेखील फुलली आहेत. पेढे, बुक्का, जपमाळा, देव-देवतांच्या मूर्ती, फोटोफ्रेम यांच्या खरेदीला भाविक पसंती देत आहेत. त्यामुळे पंढरपूर शहर व परिसरात प्रासादिक साहित्यांची दुकाने उभारल्याचे दिसून येते.

श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांकडून प्रासादिक साहित्य, फोटोफ्रेम, मूर्ती, जपमाळा त्याचबरोबर जीवनावश्यक साहित्य खरेदी करण्यास भाविक प्राधान्य देत आहेत. भाविक व नागरिकांची मागणी लक्षात घेता व्यापारी व दुकानदार यांच्याकडून दखल घेत सेवा पुरविली जात आहे. यामुळेदेखील भाविक बाजारपेठ बहरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

वर्षभरात भरणार्‍या चार मोठ्या यात्रा महत्त्वाच्या असतात. यात विशेष महत्त्वाची आषाढी यात्रा आहे. या यात्रेला 12 लाखांवर भाविक हजेरी लावतात. याच यात्रेवर पंढरपूरचे अर्थकारण अवलंबून असते. त्यामुळे वर्षभरातील मोठ्या यात्रांकडे राज्यभरातील छोट्यात्त-मोठ्या व्यापार्‍यांचे लक्ष लागलेले असते. अनेक व्यापारी पंढरपूर व परिसरात रस्त्याच्या बाजूला छोटी-छोटी दुकाने, स्टॉल उभारुन भाविकांना सेवा देतात व त्या बदल्यात आपली आर्थिक कमाई करतात. पंढरपुरातील मंदिर परिसरात त्याचबरोबर प्रदक्षिणा मार्ग, भक्तिमार्ग, 65 एकर, दर्शन रांग, गोपाळपूर रोड, रेल्वे स्थानक परिसर, वाखरी रोड, चंद्रभागा वाळवंट आदी ठिकाणी विक्रेते आपले स्टॉल लावून साहित्यांची विक्री करत आहेत.

कोरोना काळात यात्रा भरल्या नाहीत. त्यामुळे ज्यावर पंढरपूरचे अर्थकारण अवलंबून आहे, तेच ठप्प झाले होते. गतवर्षीची आषाढी बर्‍यापैकी भरली होती, तर यावर्षीची आषाढी यात्रा मोठ्या दिमाखात भरली आहे. 65 एकर, चंद्रभागा वाळवंट, मंदिर परिसर, दर्शन रांग, उपनगरीय भाग, मठ, संस्थाने हाऊसफुल्ल झाली आहेत.

विठ्ठलास प्रिय असणारी तुळशीमाळ तुळशीच्या लाकडापासून 108 मण्यांची बनविलेली असते. तुळशीच्या माळेचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामध्ये जपमाळ, पाचपट्टी माळ, दोन पट्टी माळ, गोल मण्यांची माळ, डबल पट्टी, चंदनमाळ, कातीव माळ, माऊली पदक, विठ्ठल पदक, गंठण असे प्रकार आहेत. माळेची किंमत 20 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत आहे. भाविकांकडून विशेषत: महिला भाविकांकडून माळेची मागणी होत आहे.
– महेश उपळकर तुळशीमाळ विक्रेते

Back to top button