पंढरपूर शहरातील भिंतींवर अवतरले वारकरी सांप्रदाय | पुढारी

पंढरपूर शहरातील भिंतींवर अवतरले वारकरी सांप्रदाय

पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा :  शहरात प्रवेश केला की नजरेस पडतात ते भिंतीवर रेखाटलेली श्री विठ्ठलाची तसेच विविध संतांची चित्रे, त्याचबरोबर पखवाज, टाळ, मृृदंग, वीणा, साधुसंत, देवाची रेल्वे गाडी यामुळे भिंतींवर अख्खे वारकरी सांप्रदाय अवतरल्याचे चित्र दिसून येत आहे. ही नुसती चित्रे नाहीत, तर भिंती बोलू लागल्याचे दिसून येते.

पंढरपूर शहराच्या सुंदरतेमध्ये खर्‍या अर्थाने भर पडत आहे. या अगोदर शहरात अनेक भिंतींवर आपल्या दुकानांच्या जाहिराती लिहिलेल्या दिसत होत्या. मुंबई, पुण्यातसुद्धा खूप मोठ्या भिंती दिसतात, पण तिथे आपल्या शहरातील विविधता दाखविणारी चित्रे दिसतात. खर्‍या अर्थाने तिथे लोक आपल्या दुकानाची जाहिरात करू शकतात, पण तेथील प्रशासन एवढे दक्ष आहे की लगेच कारवाई केली जाते. अगदी तसेच आपल्या शहरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहासमोर भली मोठी भिंत आहे अन् तिथेही लगेच जाहिराती चिटकावणे सुरू झाले होते, मात्र मुख्याधिकारी अरविंद माळी यांना या भिंतीवर जाहीरातींचे विद्रुपीकरण नको तर चित्रे रेखाटून भिंतींना बोलके करुयात, अशी कल्पना सुचली आणि त्यांनी अंमलबजावणी केली.

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकरी पंढरपुरात येतात. या वारकर्‍यांच्या दृष्टीस भिंतीवर वारकरी सांप्रदाय अवतरल्याचे दाखवले आहे. बारामती येथील चित्रकारांना हे काम दिले आहे. अत्यंत कमी वेळेत कलाकारांनी सर्व भिंतींना चांगल्याप्रकारे बोलके रूप दिले आहे. त्यामुळे त्या भिंतींनादेखील वाचा फुटली असल्याचे दिसून येते. सरगम चौक रेल्वे बोगदा, पोलिस स्टेशन रेल्वे बोगदा, नवीन कराड नाका, लिंकरोड, केबीपी चौक, तहसील कार्यालय रोड आदी परिसरातील भिंतींवर चित्रे रेखाटून भिंतींना जिवंतपणा आणण्याचे काम पंढरपूर नगरपालिकेने केले आहे. याबद्दल नगरपालिकेचे कौतुक केले जात आहे.

भिंती बोलू लागल्या…

पंढरपूर शहरात भिंतींवर लिंक रोड, रेल्वे बोगदा या ठिकाणी श्री विठ्ठल-रुक्मिणी, दिंडी सोहळा, स्वच्छ भारत अभियान, राधा-कृष्ण, हत्ती, विविध पक्षी, फुले, वारकरी, चंद्रभागा नदी अशी विविध चित्रे रेखाटली आहेत. यामुळे या परिसराचा चेहरा बदलला आहे. आलेल्या भाविकांचे ही चित्रे लक्ष वेधून घेत आहेत.

Back to top button