करमाळा : प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांना धक्का बुक्की करनाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल | पुढारी

करमाळा : प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांना धक्का बुक्की करनाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल

करमाळा: पुढारी वृत्तसेवा : करमाळा तालुक्यातील पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी यांच्यावर तिघांनी धक्का बुक्की व शिविगाळ करून काळे फासल्याची घटना घडली. प्रभारी गटविकासाधिकारी राजकुमार भोंग यांनी या प्रकरणात तिघांविरोधात फिर्याद दिली. यानंतर फिर्यादीनुसार सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. बालाजी गावडे, बाळासाहेब करचे (दोघे रा.जेऊर ता. करमाळा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्याचबरोबर अन्य एका अनोळखी व्यक्तीवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुपारी बारा वाजाताच्या सुमारास करमाळा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या दालना शेजारील सहाय्यक गट विकास अधिकारी कक्षामध्ये हा प्रकार घडला.

याबाबत अधिक माहिती अशी की, जेऊर ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत जेऊर येथील बालाजी गावडे, बाळासाहेब करचे यांनी सातत्याने अंदोलन केले आहे. तक्रारी केल्या आहेत. याबाबत चौकशीही लावली आहे. जेऊर ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक गणेश कळसाईत यांची ९ मे २२ ते १० एप्रिल २३ या कालावधीची चौकशीची मागणी या तक्रारदारांनी केली होती. ही माहिती व चौकशी अहवाल पुढे पाठवला जात नसल्याने आज (ता.25) रोजी तोंडाला काळे फासण्याचा तक्रारदारानी लेखी इशाराही दिला होता.

मात्र याचे गांभिर्य प्रशासनाने न घेतल्यामुळे आजचा प्रकार घडला आहे. त्या अनुषंगाने तक्रारदार बालाजी गावडे व इतर दोघे असे तिघांनी दुपारी बारा वाजता भोंग यांच्या दालनामध्ये प्रवेश केला. यावेळी जेऊर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक गणेश कळसाईत यांच्याबाबतची माहिती दिलेली आहे. यामधील त्रुटी आपण का दुरुस्त करून माहिती व चौकशी अहवाल लवकर का देत नाहीत अशी विचारणा करून कक्षात गोधंळ घातला.

यावेळी विस्तार अधिकारी मनोज म्हेत्रे हे आले असता लोकन्यायालयात तुम्ही घरकुल धारकाना नोटीसा का बजावल्या म्हणून गोधंळ घालून शिविगाळ करून संशयित बाळासाहेब करचे यांनी धक्काबुक्की केली. यावेळी अहवाल दुरूस्त करून देतो तसेच समाधान होत नसेल तर वरिष्ठांकडे अपील करा असे सागंत असताना व चर्चा चालू असतानाच बालाजी गावडे व बाळासाहेब कर्चे यांनी कागदाच्या पुढीतील काळी पावडर काढून प्रभारी गटविकास अधिकारी राजकुमार भोंग यांच्या चेहऱ्यावर फेकली व टेबलावरील सरकारी कागदपत्रावरही काळी पावडर फेकून तिघानीही पोबारा केला. विशेष म्हणजे या तक्रारदारांनी आज गट विकास अधिकारी यांच्या तोंडाला काळे फासणार असल्याचे निवेदन दिले होते.

यावेळी करमाळा पोलिसांचे दोन कर्मचारी व्हरांड्यात उभे असल्याचेही बोलले जात आहे. मात्र त्यांना गुंगारा देऊन ही घटना घडली आहे. यावेळी दालनामध्ये पोलीस उपस्थित नव्हते. त्यामुळे तक्रारदारांनी तोंडावर काळे फासण्याचा दिलेला इशारा गटविकासाधिकारी भोंग यांच्या चेह-यावर पावडर टाकून भोंग यांना निवेदन दिल्याप्रमाणे इशारा पूर्ण केला आहे . दरम्यान करमाळा पोलिसात संबंधित तिघा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास पोलीस उप निरीक्षक प्रविण धर्मा साने हे करत आहेत.

Back to top button