पंढरपूर, सुरेश गायकवाड : पंढरपूर तीर्थ विठ्ठल.. क्षेत्र विठ्ठल.. देव विठ्ठल… देवपूजा विठ्ठल… टाळ-मृदंगाचा गजर, मुखी विठ्ठलाचा जप आणि दिंडी पताका घेऊन आषाढीला दरवर्षी लाखो पावले तीर्थ पंढरीच्या दिशेने वाटचाल करीत असतात. वारी मार्गावरील गावे आणि शहरे भक्तिरसात न्हाऊन निघतात. देहू-आळंदीतून निघणारा पालखी सोहळा वाटेवरचा वैष्णवांचा मेळा सामावून घेत राहतो. पंढरीच्या दिशेने हा प्रवाह अगदी तल्लीन होत राहतो, दर्शनाची आस त्याला तहानभूक हरवायला लावते.
सावळ्या विठ्ठलाचे रूप नजरेत साठवण्यासाठी तो आसुसलेला असतो. या सोहळ्याने परिसराला जशी आध्यात्मिक अनुभूती मिळते तशी यानिमित्ताने होणार्या उलाढालीमुळे ऐहिक प्रगतीही साधली जाते.
पंढरपूर शहर आणि वारी मार्गावरील गावे आणि शहरे ही प्रगती साधत आहेत. कोरोना संकटाने मात्र ती ठप्प झाली आहे. कांदा-मुळा-भाजी; अवघी विठाई माझी… असा भक्तीचा मळा फुलविणार्या या परिसराला आता ठप्प झालेला ऐहिक प्रगतीचा मळा फुलण्याची आस लागली आहे.
दक्षिण काशी म्हणून पंढरपूरची ओळख आहे. पंढरपूर वारीला 350 वर्षांची परंपरा आहे. मजल – दर मजल करीत लाखोंच्या संख्येने पायी निघणारा पालखी सोहळा जगातील सर्वांत मोठा यात्रा सोहळा मानला जातो.
'माऊली' या एका शब्दाच्या छताखाली सगळे जणू एकवटलेले असतात. ही यात्रा म्हणजे केवळ धार्मिक, सांस्कृतिक परंपराच जपते असे नाही; तर सामाजिक, आर्थिक विकास साधण्याचे कामही करत आहे.
पंढरपुरात वर्षाकाठी एक कोटीहून अधिक भाविक दर्शनासाठी येतात. यात माघी, चैत्री, आषाढी व कार्तिकी या चार यात्रांना विशेष महत्त्व आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्यासह प्रमुख 10 संतांच्या पालख्या आणि शेकडो दिंड्यांसह लाखो भाविक मजल – दरमजल करत पंढरपूरला येतात. राज्याचा हा उत्सवी सोहळाच असतो.
राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाकडूनही भाविकांना अधिकाधिक सेवासुविधा उपलब्ध करून देत धार्मिक पर्यटनवाढीस प्रोत्साहन दिले जात होते.
श्री विठ्ठल दर्शनासाठी येणार्या भाविकांमुळे मंदिराला दानधर्माच्या माध्यमातून मोठे आर्थिक उत्पन्न मिळते. बाजारपेठही फुललेली असते. त्यामुळे अर्थकारण बहरते.
रेल्वे, बसेसच्या उलाढालीसह खासगी वाहतूकदारांचा व्यवसायही चांगला होतो. पंढरीतील निवासस्थाने, हॉटेलची उलाढाल चांगली होते. प्रासादिक साहित्य, तुळशीहार, पुष्पहार विक्रेते खरेदी, हॉटेल, प्रवासी वाहने या निमित्ताने आर्थिक स्रोत सतत वाहते राहतात.
तात्पर्य आध्यात्मिक प्रगतीबरोबरच वारीमुळे या परिसराची ऐहिक प्रगतीही साधली जाते. परंतु गेल्या दीड वर्षांपासून देऊळ बंद राहिले आहे.
याचा थेट परिणाम येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या आर्थिक उत्पन्नावर आणि त्याला अनुसरून शेकडो कोटी रुपयांच्या बाजारपेठेवरही झाला आहे.
प्रासादिक साहित्य विक्रेते, चहा, पाणी विक्रेते आणि माघी, चैत्री, आषाढी व कार्तिकी यात्रेला उपवासाचे पदार्थ विक्री करणारे विक्रेते आणि फळ विक्रेते यांची मोठी उलाढाल होते.
याचा विचार करून दर कृषी उत्पन्न समितीकडून यात्रेला पाच हजार टन केळी आयात केली जाते. जनावरांचा बाजारही भरतो. या सर्व मामध्यमातून सर्वच घटकांचे रोजचे अर्थचक्र चालत होते.
वारीच्या वाटेवरील आणि आसपासच्या गावांनाही वारकर्यांकडून खरेदी सेवांमुळे उत्पन्नाचे साधन होते. दरवर्षी किमान 500 कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल होते. ती ठप्प झाली आहे.
दोन वर्षांतील ही उलाढाल सुमारे हजार कोटी रुपयांच्या घरात झाली असती. ती पूर्णपणे थांबली असून संपूर्ण अर्थचक्रच कोलमडले आहे.
यंदाही 20 जुलै रोजीची आषाढी वारी मर्यादित आणि प्रातिनिधिक स्वरूपात साजरी केली जाणार आहे. कडक संचारबंदी आहे.
आता तरी ही कोरोनाची महामारी हटू दे, भक्तांना विठ्ठल दर्शनाचा मार्ग मोकळा होऊ दे. त्यानिमित्ताने अर्थचक्र पुन्हा गतीला लागून जनजीवन सुरळीत होऊ दे, अशी आर्त विनवणी आणि अपेक्षा वारकर्यांतून व्यक्त होत आहेत.