पंकजा मुंडे दिल्लीत, नाराज कार्यकर्त्यांशी संवाद साधणार | पुढारी

पंकजा मुंडे दिल्लीत, नाराज कार्यकर्त्यांशी संवाद साधणार

बीड/ नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : पंकजा मुंडे दिल्लीत दाखल झाल्या आहेत यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. पंकजा मुंडे यांनी मागच्या दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळ विस्तारात डावलल्याने मुंडे समर्थक कमालीचे नाराज झाले आहेत. मागच्या दोन दिवसात शेकडो पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा वरिष्ठांकडे सोपवला आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर मुंडे दिल्लीत दाखल झाल्या असून मंगळवारी त्या नाराज कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

अधिक वाचा : 

पंकजा आणि प्रीतम मुंडे यांना डावलले

भाजप पक्ष उभारणीत दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून पंकजा आणि खासदार प्रीतम मुंडे पक्षासाठी योगदान देत आहेत. त्यांना मानणारा मोठा वर्ग राज्यभरात आहे. असे असताना पंकजा आणि प्रीतम मुंडे यांना पक्षात वारंवार डावलले जात असल्याची भावना मुंडे समर्थकांमध्‍ये झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार झाला. विस्तारापूर्वी केंद्रीय मंत्री पदासाठी खा.प्रीतम मुंडे यांचे नाव चर्चेत होते.

दरम्यान मुंडे समर्थक असलेल्या भागवत कराड यांची वर्णी लागली. दोनवेळा जनतेतून विक्रमी मते घेऊन निवडून आलेल्या असतानाही आणि संसदेत उत्कृष्ट खासदार असा गौरव झालेला असतानाही प्रीतम मुंडे यांना मंत्री पदासाठी डावलण्यात आले. या प्रकाराने मुंडे प्रेमींच्या भावनांचा स्फोट झाला.

शेकडो पदाधीकाऱ्यांचा राजीनामा

मुंडे यांनी आपण नाराज नसल्याचे सांगूनही भाजपचे पदाधिकारी आणि स्थानीक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी आपल्या पदाचा राजीनामा देत आहेत.

एकट्या बीड जिल्ह्यात पन्नासपेक्षा जास्त तर राज्यात शेकडो पदाधिकाऱ्यांनी राजीनामा वरिष्ठांकडे सोपवला आहे.

पाहा फोटो : केंद्रीय मंत्रिमंडळातील महिला

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

या प्रकाराने मोठी खळबळ उडालेली असताना रविवारी (दि. ११) मुंडे दिल्लीत पोचल्या असल्याचे अधिकृत वृत्त आहे. त्यांना भाजपातील वरीष्ठ नेत्यांनी बोलावले असल्याची चर्चा आहे. त्या पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त करणार असल्याचे सांगितले जात आहे.

जेपी नड्डा यांच्याकडे नाराजी व्यक्त करणार

प्रीतम मुंडे या मंत्रिपदाच्या दावेदार आणि पात्र असतानाही त्यांना डावलण्यात आल्याबद्दल त्या नाराजी बोलून दाखवण्याची चर्चा आहे.
प्रत्येकवेळी मुंडे कुटुंबीयांना डावलले जात असल्याचेही त्या नड्डा यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे सूत्रांकडून कळतेय.

अधिक वाचा : 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विस्तारित मंत्रिमंडळाचा विस्तारात प्रीतम मुंडे यांचा समावेश केला जाईल, असे आडाखे बांधले जात होते. परंतु, प्रीतम मुंडेंऐवजी डॉ. भागवत कराड यांना मंत्रीपद देण्यात आले.

मुंडे भगिनी त्यामुळे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या  होत्या. त्यावर पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासाही केला.

 

मात्र, कालपासून पंकजा समर्थकांनी अचानक राजीनामे दिल्याने भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. त्यातच पंकजा मुंडे यांना अचानक दिल्लीत बोलावण्यात आल्याने अधिकच खळबळ उडाली आहे.
हे ही पाहा

Back to top button