मिरज : पळालेल्या दरोडेखोराला अटक | पुढारी

मिरज : पळालेल्या दरोडेखोराला अटक

मिरज; पुढारी वृत्तसेवा : मिरज येथील कोरोना रुग्णालयातून पलायन केलेला दरोड्यातील संशयित आनंदा रामा काळे (वय 30, रा. मल्लेवाडी, ता. मिरज) याला मिरज ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून टाकळी येथे अटक केली.

मिरज-पंढरपूर रस्त्यावरील तानंग फाटा येथे गेल्या महिन्यात दरोडा पडला होता. या गुन्ह्याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी काळे याला अटक केली होती.

सध्या तो सांगली येथील कारागृहात होता. परंतु, कारागृहात तो कोरोनाबाधित झाल्याने उपचारासाठी मिरज कोरोना रुग्णालयात दाखल केले होते. दि. 7 जुलै रोजी काळे हा मध्यरात्री रुग्णालयातून पसार झाला होता.

पोलिस निरीक्षक मिलिंद पाटील, सहायक पोलिस निरीक्षक समाधान बिले, प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक केशव रणदिवे, पोलिस हवालदार प्रवीण वाघमोडे, प्रवीण तेली, अशफाक शेख, नयना पाटील यांचे पथक त्याचा शोध घेत होते.

काळे हा टाकळी येथे येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने टाकळी आडवा रस्ता येथे सापळा रचून त्याला अटक केली. पुढील तपासासाठी त्याला महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याकडे सोपवण्यात येणार असल्याचे मिरज ग्रामीण पोलिसांनी सांगितले.

Back to top button