सोलापूर : वाळू माफियाने पोलिसाला चिरडले | पुढारी

सोलापूर : वाळू माफियाने पोलिसाला चिरडले

मंगळवेढा : पुढारी वृत्तसेवा

वाळूचे अवैधपणे उत्खनन करून वाहतूक करणार्‍या माफियाच्या टेम्पोने पोलिस कॉन्स्टेबलला जोरदार धडक देऊन चिरडले. यात पोलिस कॉन्स्टेबलचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेनंतर टेम्पोचालक फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे प्रशासनासह पोलिस खात्यात मोठी खळबळ उडाली आहे.

गणेश प्रभू सोनलकर (वय 32, रा. बुरलेवाडी, ता. सांगोला, सध्या मंगळवेढा) असे मृत पोलिसाचे नाव आहे. या घटनेची फिर्याद गोणेवाडीचे पोलिस पाटील संजय मेटकरी यांनी दिली आहे. ही घटना शनिवारी सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास घडली असून, अज्ञात टेम्पोचालक त्याचा साथीदार व मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मंगळवेढा पोलिस स्टेशन येथील कॉन्स्टेबल गणेश प्रभू सोनलकर हे शिरसी येथे हॅटसन डेअरीजवळ लोकअदालतीचे बजावलेले समन्स फिर्यादीकडून कोर्टात जमा करण्याच्या उद्देशाने जात होते.

शिरसी येथे आल्यानंतर त्यांनी पोलिस पाटील संजय मेटकरी यांना फोन करून बोलावून घेतले. ते येईपर्यंत सोनलकर स्वत:च्या मोटारसायकलवर रस्त्याच्या कडेला थांबले होते.

यावेळी बेकायदेशीररित्या वाळू वाहतूक करणारा पांढर्‍या रंगाचा टेम्पो येत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी त्या टेम्पोला थांबण्याचा इशारा केला. परंतु टेम्पोचालकाने मात्र आपल्या वाहनावर कारवाई होईल, या भीतीपोटी सोनलकर यांच्या अंगावर टेम्पो घातला. टेम्पो भरधाव वेगात असल्याने सोनलकर चाकात अडकले. दोन-तीन वेळा गाडी मागे-पुढे करून चाकात अडकलेले सोनलकर बाहेर पडल्यानंतर टेम्पोचालक व त्याचा साथीदार टेम्पो तेथेच सोडून पसार झाले.

या घटनेची माहिती समजताच पोलिस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक विभागीय अधिकारी राजश्री पाटील यांनी मंगळवेढा पोलिस स्टेशन येथे भेट दिली. या घटनेची सविस्तर माहिती घेतली असून या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.

Back to top button