सोलापूर : तीर्थच्या राम, लक्ष्मण, सीतामातेच्या मंदिरामुळे धार्मिक पर्यटनाला चालना | पुढारी

सोलापूर : तीर्थच्या राम, लक्ष्मण, सीतामातेच्या मंदिरामुळे धार्मिक पर्यटनाला चालना

जगन्नाथ हुक्केरी; सोलापूर : महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश या तीन राज्यांच्या सीमा. तीन प्रांताच्या वेगवेगळ्या परंपरा. बहुभाषिक माणसे आणि संस्कृतीतही विविधता. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आघाडीवर असलेल्या सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या पर्यटनाच्या जोडीला धार्मिक स्थळे असल्याने त्यातून अर्थकारणाला चांगलेच बळ मिळत आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील तीर्थ येथे प्रभू राम, सीतामाता, भरत आणि लक्ष्मण यांचे मंदिर आहेत. रामनवमीला नागरिक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. तीर्थच्या या मंदिरामुळे पर्यटनाला चांगलीच चालना मिळत आहे.

सोलापूरच्या स्थानिक धार्मिक पर्यटनाला शेजारच्या जिल्ह्यातील स्थळांमुळेही चांगलीच पसंती मिळत आहे. तुळजापूरची आई तुळजाभवानी, येडशी येथील रामलिंग, गाणगापूरचे दत्तात्रय, शिखर शिंगणापूरचे शंभू महादेव ही स्थळे सोलापूरच्या परिघात आहेत. तेथून दर्शन करुन निघाल्यानंतर त्यांची पाऊले सोलापुरातील मंदिरांकडे वळतात.

यात पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ, सोलापूरचे शिवयोगी सिद्धरामेश्वर, वडवळचे नागनाथ, गौडगावचे हनुमान मंदिर या स्थळांबरोबरच गाव तेथे हनुमान आणि महादेव मंदिर आहेतच. वर्षातील महत्त्वाच्या चार एकादशींबरोबरच 15 दिवसांच्या एकादशीला पंढरीत भाविकांची मोठी गर्दी असते. अक्कलकोटला गुरुपौर्णिमेसह दर गुरुवारी भाविकांची मांदियाळी जमलेली असते. या धार्मिकस्थळांना भेटी देऊन दर्शन घेण्यासाठी येणार्‍या भाविकांमुळे लॉजिंग, हॉटेल व्यवसायालाही मोठ्या प्रमाणात बरकत येत आहे. हैद्रा (ता. अक्कलकोट), बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील दर्गा, बर्‍हाणपूर (ता. अक्कलकोट) येथील सिद्धयप्पा मंदिर, वागदरीतील परमेश्वर मंदिर, बार्शीतील भगवंत मंदिर, बाळेतील खंडोबा मंदिराबरोबरच केतूचे मंदिरही प्रसिद्ध आहे.

वळसंग येथील श्री शंकरलिंग मंदिराला भेट देऊन महात्मा गांधी यांनी याच मंदिरात सभाही घेतली होती. यामुळे या मंदिराचे महत्त्व आहे. भीमा व सीना नदीच्या संगमावर असलेल्या हत्तरसंग कुडल येथे हरिहरेश्वराचे प्राचीन मंदिर असून, या मंदिरात मराठीत शिलालेखही आहे. याशिवाय मार्डीची यमाई, नान्नज येथील माहूरची आईच्या दर्शनासाठी भाविकांची नेहमीच गर्दी असल्याने अर्थकारणाला चालना मिळत आहे.

या धार्मिक पर्यटनाबरोबरच उजनी धरण, सर विश्वेश्वरय्यांनी आराखडा तयार केलेले अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरण, नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथील माळढोक अभयारण्यात वास्तव्यास असलेल्या विविध पशू-पक्ष्यांचे सध्या राज्यात आकर्षण निर्माण झाले आहे. पंढरपूर तालुक्यातील पुनर्वसित चिंचणीने विविध विकासकामांच्या माध्यमातून वेगळेपण जपण्याचा प्रयत्न केल्याने या गावाची राज्याच्या नकाशात नव्याने ओळख निर्माण झाली आहे. अकलूजची शिवसृष्टी, सोलापुरातील भुईकोट किल्ला, माचणूर येथील सिद्धेश्वर मंदिर, माळशिरस तालुक्यात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची कन्या आणि संताजी, धनाजी यांच्या समाधीचे सुशोभीकरण झाल्यास जिल्ह्याच्या ऐतिहासिक पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. अक्कलकोटमधील नवीन राजवाड्यातील शस्त्रगाराचेही वैशिष्ट्य आहे.

तीर्थचे सगळ्यांना आकर्षण

दक्षिण सोलापूर तालुक्यातील तीर्थ येथे पुरातन श्रीराम मंदिर आहे. प्रभू रामचंद्रांनी वनवासात याठिकाणी भेट दिल्याची अख्यायिका आहे. याच मंदिर परिसरात लक्ष्मण, भरत आणि सीतामातेचे मंदिर आहे. गुढीपाडव्यानंतर तीन दिवस मोठ्या प्रमाणात येथे यात्रा भरते. परिसरातील नागरिकांसह बाहेर गावावरुन आलेल्या भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तीर्थपासून दीड कि.मी. अंतरावर हालहळ्ळी अ. (ता. अक्कलकोट) येथे हनुमानाचे मंदिर आहे. श्रीराम बंधू लक्ष्मण, भरत आणि पत्नी सीतामातेसोबत तीर्थ येथे थांबले असताना त्यांच्या सुरक्षेसाठी रामभक्त हनुमान हे हालहळ्ळी ‘अ’ येथे थांबून पहारा देत होते, अशी अख्यायिका आजही सांगितली जाते.

पर्यटनातून रोजगार निर्मिती मिळण्यास मदत होते. प्रत्येक गावाने वेगळेपण जपत पर्यटनवाढीला चालना द्यावी. असे उपक्रम राबविणार्‍या गावांना मदत करण्यास तयार आहे. सरपंच, संस्थांच्या माध्यमातून आज विविध उपक्रम राबविणार आहे.
– आ. सुभाष देशमुख, माजी सहकार मंत्री

हेही वाचलत का:

 

चला सफर करूया भिवंडीच्या किल्ल्याची

Back to top button