सोलापूर : अशी भेट... कधी झाली होती का थेट ? | पुढारी

सोलापूर : अशी भेट... कधी झाली होती का थेट ?

जगन्नाथ हुक्केरी; पुढारी ऑनलाईन सोलापूर : राजकारणात काहीच अशक्य नसते आणि नसणार पण. याची अनुभुती वारंवार आलेली. आता असाच अनुभव एक नव्हे, दोन नव्हे तर तीन भेटीवरुन आला. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे घेऊन डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी चक्क ‘जनवात्सल्य’च्या सावलीत असलेल्या माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांची भेट घेतली, तर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील आणि आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा केली. यावरुन अशी भेट… कधी झाली होती का थेट? असा सूर आळवला जात आहे.

विकासाला खत-पाणी घालण्याचे काम सत्ता करते. याच सत्तेवर असताना माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून अनेक कामे केली. आज त्यांच्या भागातील रस्ते किंवा इतर कामांसाठी बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन निधीसाठी पाठपुरावा करावा लागला. आ. रणजितसिंह मोहिते-पाटील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना संपूर्ण महाराष्ट्राचे ते आयकॉन ठरले. त्यानंतर खासदारकी सांभाळतानाही तिच उर्जा आणि तिच ताकद त्यांच्यात होती. आज त्यांनी घड्याळ सोडून कमळाच्या सान्निध्यात येण्याचे पसंत केले. तसे पाहिले तर घड्याळाला ‘काटे’ अन कमळ चिखलात. घड्याळाचे ‘काटे’ बाजूला सारत ते कमळाच्या ‘चिखलात’त रमण्याचा निर्णय घेतला. घड्याळाने सगळे काही दिले. पण समाधान दिले की नाही, हे अनुत्तरीतच. कधी कधी कपड्यातील कुसळाप्रमाणे घड्याळाचे ‘काटे’ रुतत राहिले असावेत, असेही वाटते.

‘चिखला’तील कमळाने माढ्याची रणभूमी हस्तगत केल्यानंतर रणजितसिंह मोहिते-पाटलांना आमदारकीच्या रुपात सुगंधाबरोबरच सन्मानही दिला. (हा कोणता सन्मान?) कृष्णा-भीमा स्थिरीकरणासाठी दिलेला शब्द आणि पुढची रणनिती ठरविण्याची जबाबदारी. अधून-मधून मोठे दादा म्हणजे विजयसिंह मोहिते-पाटील दिल्लीच्या हवामानात हवापालट (राजकीय अंदाज) करण्यातही रमत आहेत. रणजितसिंहांना नागपूरकरांकडून ‘नजराणा’ तर दिल्ली दरबारी ‘मुजरा’ही मिळत आहे. यामुळे ‘शिवरत्न’ पुन्हा गजबजून जात आहे.

भावकी असली तरीही ‘शिवरत्न’ आणि ‘प्रतापगड’ यांच्यात फारसे जमले नाही, हे जगजाहीर आहे. त्यात आता बिबट्याचे शिकार केल्यानंतर डॉ. धवलसिंह मोहिते-पाटलांच्या हातात काँग्रेसने विरोधकांची शिकार करण्यासाठी जिल्हाध्यक्षपदाची बंदूक दिली. याच उत्साहात त्यांचे मार्गक्रमण सुरु आहे. त्यांनी काँग्रेसपासून दुरावलेल्या आणि दूरदूर जात चालेल्या कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याबरोबरच ज्येष्ठांची भेट घेऊन रणनिती आखण्यास सुरुवात केली. यातूनच डॉ. धवलसिंह यांनी कार्यकर्त्यांच्या मनाची चांगल्या पद्धतीने मशागत करत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांची ‘जनवात्सल्य’वर जाऊन भेट घेतली अन सोलापूर जिल्हा एकसंघ ठेवण्याचा विडा उचलला. ‘प्रतापगड’ आणि ‘जनवात्सल्य’च्या संपर्कातून जुन्या घटना बदलून नवे आणि सकारात्मक समीकरण घडत आहेत. ही बाब काँग्रेसबरोबरच जिल्ह्यासाठी चांगलीच आहे. यातून फक्त भेटी आणि गाठी न राहता त्याचे रुपांतर नव्या सत्राची सुरुवात व्हावी आणि विकास साधावा, एवढीच अपेक्षा.

कामापुरता ‘मामा’

उंदरगावच्या साधूचे ‘मनोहरी’ कृत्य जगजाहीर झाल्यानंतर सत्तेवर असलेल्या वा नसलेल्या सगळ्या मामांनी उंदगावच्या मनोहरी आश्रमातून काढता पाय घेतला. सुरुवातीला मामाला वाचविण्याचा प्रयत्नही झाला. त्याच्यावर बलात्काराचे गुन्हे दाखल झाल्यानंतर ‘कामापुरता मामा’ म्हणत सगळ्यांनी संबंध नसल्याचे पुरावे सादर करत हात वर केले.

पोकळ धमक्या

भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केल्यानंतर खमक्या पक्षाच्या जिल्हा प्रमुखांनी श्रीकांत देशमुख यांच्या गावात जाऊन आंदोलन करण्याची धमकी दिली होती. या घटनेला दहा दिवस उलटले तरी काहीच न केल्याने प्रसिद्धीसाठी खमक्याच्या नुसत्या पोकळ धमक्या होत्या का, असाच सवाल उपस्थित होत आहे.

नुसत्या वार्‍याच…

राष्ट्रवादीच्या प्रवेशासाठी आतूर असलेल्या नगरसेवक आनंद चंदनशिवे आणि तौफिक शेख यांच्या श्रेष्ठींच्या भेटीसाठी वार्‍याच सुरु आहेत. भेट, चर्चा आणि प्रसिद्धी, यापुढे निर्णय होत नसल्याने राष्ट्रवादीतील प्रवेश का रखडला, असाही सूर सध्या सर्वत्र निनादत आहे.

मनसे… दिलसे…

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिलीप धोत्रे यांच्या गळ्यात नेतेपदाची माळ घातल्यानंतर ते दिलसे राज्याचे दौरे करत वातावरण निर्मिती करत आहेत. यात शाखांचे उद्घाटन , पक्षप्रवेश, मेळावे यावर मोठा भर देण्यात येत आहे. स्थानिक पातळीवरही दिलसे काम करण्याचे नियोजन ते आखत आहेत. यामुळे मनसे जिल्ह्यात दिलसे वाढण्याच्या आशा आहेत.

टोलवाल्याची ‘दादा’गिरी अन म्हेत्रे

अक्कलकोटच्या रणभूमीत मतदारांनी दुसर्‍यांदा नापसंती दाखवल्यानंतर माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे थोडे निवांतच आहेत, असेच कार्यकर्त्यांना वाटत आहे. कदाचित त्यांच्या घरात घडलेल्या दु:खाच्या घटनांचाही हा परिणाम असावा. पण यातूनही सावरत ते अन्यायाविरोधात आवाज उठवत आहेत. त्यांचे बंधू काँग्रेचे अक्कलकोट तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे यांच्या वाढदिनी जेऊर येथे झालेल्या मेळाव्यात हजेरी लावून ठोकलेले भाषण, मुंबई दरबारी मंत्र्यांना भेटून रस्ते, एकरुख उपसा सिंचन योजनेसाठी मागितलेला निधी, या चर्चेच्या घटनांबरोबरच वळसंग (ता. दक्षिण सोलापूर) येथे सुरु झालेल्या नव्या टोल नाक्याच्या वसुलीला दादागिरी म्हणत सिद्धाराम म्हेत्रे अन्याय सहन करणार नाही, अशी ‘दाद’ वाहनधारकांच्या भावनेला दिल्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आले.

अकलूजमध्ये दर्दी… इतरत्र गर्दी…

अकलूज आणि ‘शिवरत्न’ या दोन्हीला गर्दीचा तसा लळाच. या गर्दीत कधी नुसती गर्दी वाटली नाही, तर आपले शक्तीस्थान असलेल्या ‘शिवरत्न’वर प्रेम करणाऱ्या दर्दी यांचा समावेश अधिक होता. 2009 च्या स्थित्यंतरानंतर गर्दीत थोडी घट झाली. मात्र दर्दीच्या येरझाऱ्या सुरूच होत्या. अन्यत्र मात्र ही गर्दी ओसरते, कमी होते, कधीकधी दिसतही नाही.

हेही वाचलत का :

‘एक थी बेगम’ फेम शाहब अलीने पत्रकारिता का सोडली?

Back to top button