UPSC : सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मुलांचा यूपीएससीत डंका | पुढारी

UPSC : सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मुलांचा यूपीएससीत डंका

माळीनगर (सोलापूर); पुढारी वृत्तसेवा : वाघोली (ता. माळशिरस) येथील भारत जालिंदर मिसाळ या शेतकऱ्याचा मुलगा सागर भारत मिसाळ यांनी UPSC च्या परीक्षेत ३५४ रँकने पास होऊन यश संपादन केले आहे.

या पूर्वी २०२० मध्ये सागर मिसाळ यांनी UPSC च्या परीक्षेत २०४ रँकने यश मिळवले होते. त्यांची उत्तराखंडमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून निवड झाली होती. जिल्हाधिकारी व्हायचे स्वप्न मनाशी बाळगून सागर मिसाळ यांनी हा दुसरा प्रयत्न केला होता. त्यातही त्यांनी यश प्राप्त केले. या यशाबद्दल सागर मिसाळ यांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

सागर मिसाळ हे एक गरीब शेतकरी कुटुंबातील असून थोड्या फार शेतीत आई वडिलांनी कष्ट करून त्यांना व त्याच्या लहान भावाला शिक्षण दिले. भारत मिसाळ यांचा दुसरा मुलगाही UPSC चा अभ्यास करीत आहे.

सागर मिसाळ यांचे प्राथमिक शिक्षण वाघोली (ता. माळशिरस) येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. तर माध्यमिक शिक्षण सदाशिवराव माने विद्यालय अकलूज येथे झाले असून कृषी पदवी घेऊन ते UPSC चा अभ्यास करीत होते.

आणखी एका शेतकऱ्याच्या मुलाचे UPSC मध्ये यश

सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातल्या शिंदेवाडी गावात राहणाऱ्या शुभम जाधव याने UPSC च्या परीक्षेत ४४५ वा क्रमांक मिळवला आहे. शुभम जाधव यांचे आई-वडील शेती करतात. पाचव्या प्रयत्नांमध्ये त्यांना हे यश मिळवले आहे. त्यांनी आधी तीन वेळा मुलाखतीपर्यंत मजल मारली होती.

सासवड माळी एज्युकेशन सोसायटी संचालित दि मॉडेल विविधांगी प्रशाला, माळीनगर या ठिकाणी शुभम जाधव यांनी दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण केले.

काहीतरी यश माझ्या हाताला लागलं आहे. एवढ्या वर्षांची प्रतीक्षा फळाला आली. आईवडील, नातेवाईक आणि गुरुजनांच्या पाठिंब्यांमुळे हे शक्य झालं. माझे आत्ये भाऊ अमोल क्षीरसागर यांनी मला मला फार मदत केली. पाठिंबा दिला, प्रोत्साह दिलं. त्यामुळे इथपर्यंत पोहोचणं शक्य झालं आहे, असं शुभम जाधव यांनी सांगितले.

UPSC परीक्षेत बार्शीच्या अजिंक्य यांचे दुसऱ्यांदा यश

बार्शी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दोन वेळा उत्तीर्ण झालो. पण जिल्हाधिकारी होण्याची इच्छा होती. त्यामुळे यूपीएससीची तयारी सुरूच होती. शिक्षण सुरू असताना दोन वेळा यूपीएससी परीक्षा दिली, पण यश आले नाही. आता तिसऱ्या प्रयत्नांमध्ये मात्र यश प्राप्त झाल्याचे बार्शी येथील अजिंक्‍य विद्यागर यांनी दीड वर्षापूर्वी म्हटले होते. आता अजिंक्य यांनी दुसऱ्यांदा UPSC परीक्षा पास होत बार्शीत इतिहास घडवला.

पहिल्यांदा UPSC क्रॅक केल्यानंतर रेल्वे सेवेत अधिकारी असलेले अजिंक्य आज दुसऱ्यांदा UPSC परीक्षा पास झाले आहेत. सध्या ते गुजरातच्या वडोदरा येथे कार्यरत आहेत. आता दुसऱ्यांदा UPSC परीक्षा पास होऊन देशात 617 वी रँक मिळवत ते उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे IPS होण्याचं त्यांचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे.

अजिंक्‍य यांचे वडील प्रा. अनंत विद्यागर हे बार्शी येथील बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेजमधून सेवानिवृत्त झाले आहेत तर आई आशा जोगदंड-विद्यागर आगळगाव येथे मुख्याध्यापिका आहेत.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : कर्मवीर भाऊराव पाटील अण्णांनी त्यांच्याच ऐतवडे बुद्रुक गावात उभ्या केलेल्या शाळेला भेट

Back to top button