सोलापूर : शेतकर्‍यांनो उद्योजक बना; केंद्रीय मंत्री खुबा यांचे आवाहन | पुढारी

सोलापूर : शेतकर्‍यांनो उद्योजक बना; केंद्रीय मंत्री खुबा यांचे आवाहन

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : शेतकर्‍यांना नुसते कष्टकरी, श्रमकरी, श्रमयोगी होऊन थांबू नका. डिजिटल युगात उद्योजक बना, शेतातील उत्पादन खर्च कमी करुन अधिक उत्पादन घ्या. त्यासाठी नवनवीन प्रयोग करा, असे आवाहन केंद्रीय रासायनिक आणि खते विभागाचे राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी सोलापूर मधील एका कार्यप्रसंगी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

श्री सिद्धेश्‍वर देवस्थान, सोलापूर कृषी विभाग व जिल्हा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ५२ वे श्री सिद्धेश्‍वर कृषी व पशु संवर्धन प्रदर्शन गुरुवारी (दि. २९, डिसेंबर) ते सोमवार (दि. २, जानेवारी) या कालावधीमध्ये होम मैदान येथे आयोजित केला आहे. या प्रदर्शनाचा उदघाटन सोहळा गुरुवारी सायंकाळी केंद्रीय रासायनिक आणि खते विभागाचे मंत्री भगवंत खुबा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी खुबा यांनी शासनाच्या अनेक योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करत, शेती आता सर्व तांत्रिक बाबींची माहिती घेऊन करावी लागत आहे. यासाठी योग्य ते शिक्षण घेतल्याने अनेक व्यवसाय वाढीस लागतील असेही म्हणाले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी इंडीचे आमदार यशवंतगौडा पाटील, सिद्धेश्‍वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी, प्रमुख यात्रा समितीचे सिद्धेश्‍वर बमणी, कृषी प्रदर्शन समितीचे प्रमुख गुरुराज माळगे, चेतन नरोटे, पुष्पराज काडादी, जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे उपस्थित होते.

आठ वर्षांपुर्वी साखर कारखान्यांची खूप वाईट अवस्था होती. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर इथेनॉल तयार करण्यास प्रोत्साहान देत आहेत. पेट्रोल आणि डिझेलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याचा निर्णय घेतल्याने साखर कारखान्याने फायद्यात येत आहेत. शेतकर्‍यांनी सोलरसाठी कुसुम योजनेचाही लाभ घ्यावा असे आवाहन खुबा यांनी केले.

यावेळी माजी आमदार यशवंतराव पाटील यांनी कृषी प्रदर्शनामुळे शेतकर्‍यांना कृषी ज्ञान उपलब्ध होते. सोलापूर, विजयपूर, गुलबर्गा ही कायम दुष्काळी जिल्हे. परंतु सिंचन सुविधांमुळे शेतीचा विकास झाला. सोलापूर जिल्हा हा देशात सर्वाधिक साखर कारखाना असणारा जिल्हा आहे, कृषी समृध्द झाली तरच शेतकरी समृध्द होईल असे देखील ते म्हणाले.

सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी प्रयोगशील बनले असून, द्राक्ष, केळी, ऊसाबरोबरच ड्रॅगनसारखे आंतरराष्ट्रीय फळपिकेही शेतकरी घेत आहेत. तर पूर्वी कृषी प्रदर्शन ही सिद्धेश्‍वर प्रशालेतील दोन खोल्यांमध्ये भरविले जात होते. यात सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे धान्य, पीक प्रदर्शनात ठेवले जायचे त्याला प्रतिसाद मिळू लागला. त्यामुळे शेतकर्‍यांची मागणी लक्षात घेऊन, मोठ्या प्रमाणात हे प्रदर्शन भरविले जात आहे. यंदा २५० पेक्षा अधिक स्टॉल लावले आहेत. पुढील वर्षी ५०० पेक्षा अधिक स्टॉल समाविष्ट करण्याचा मनोदय धर्मराज काडादी यांनी व्यक्त केला.

यंदा रासायनिक खतापोटी अडीच लाख कोटींची बोजा

शेतकर्‍यांना स्वस्तात रासायनिक खते उपलब्ध व्हावी यासाठी खतांवर अनुदान दिले जाते. आंतरराष्ट्रीय पातळीवर रासायनिक खतांच्या किमती वाढत आहेत. रशिया आणि युक्रेन युध्दामुळे अडीच लाख कोटी रुपयांचा शासनावर बोजा पडणार आहे. त्यामुळे शासनाने आता नॅनो युरिया बाजारात आणला असून, पुढच्या वर्षी नॅनो डिएपी आणण्यात येणार असल्याचे खुबा यांनी सांगितले. सेंद्रीय शेतीसाठी केंद्र शासनाने मोठ्या निधीची तरतूद केल्याची माहिती खुबा यांनी दिली.

हेही वाचा

Back to top button