सागोला : अजनाळे येथील डाळिंब होतेय नष्ट | पुढारी

सागोला : अजनाळे येथील डाळिंब होतेय नष्ट

सागोला : पुढारी वृत्तसेवा डाळिंबाचा कॅलिफोर्निया म्हणून जगभर नावलौकिक मिळवलेल्या अजनाळे गावाला कुणाची नजर लागली. एक-दोन वर्षात होत्याचं नव्हते झाले. अजनाळे गावात जवळपास 1300 हेक्टर वर डाळिंबाच्या बागा होत्या. परंतु तेल्या, मर आणि पिन होल बोरर या रोगांच्या प्रादुर्भावामुळे गावातील जवळपास 900 हेक्टर वरच्या डाळिंबाच्या बागा जळून गेल्या आहेत. त्यामुळे येथील शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे.

दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण डाळिंब उत्पादन करणार्‍या अजनाळे गावावर कुणाची नजर लागली. एकामाग एक डाळिंबाचे प्लॉटच्या प्लॉट जळून गेले. मग काय गावातील डाळिंब गेलं आणि गावाला जणू उतरती कळाच लागली. डाळिंब पिकाला सध्या मोठ्या प्रमाणात कीड लागली आहे. झाडे पिवळी पडून मोठ्या प्रमाणात जळून जाऊ लागली आहेत. सुरुवातीला डाळिंब बागेतील एक दोन झाडे पिवळे होऊन जळून जातात. त्यानंतर संपूर्ण प्लॉटच्या प्लॉट काही दिवसातच नष्ट होत आहे. अजनाळे गावाने डाळिंब म्हणजे काय असते हे सांगोला तालुक्यासह राज्याला तसेच देशाला दाखवून दिले. त्यामुळे कृषी तज्ज्ञ, राजकीय नेते मंडळी तसेच मंत्री यांनी देखील या गावातील डाळिंब बागांची पाहणी केलेली आहे.

दुष्काळी तालुका असला तरी डाळिंबामुळे सुकाळ निर्माण झाल्याचे चित्र दिसून येते. गणेश, भगवा, आरकता या डाळिंबाने अजनाळे गावाने जगातील बाजारपेठ काबीज केली होती. या डाळिंब पिकाने गावातील शेतकर्‍यांचे राहणीमान बदलले. या डाळिंबाने आर्थिक जीवनमान ही उंचावले. अजनाळे गावातील शेतकर्‍यांनी खडकाळ माळरानावर शेतीतून हमखास उत्पादन मिळत असल्यामुळे शेतीतून मिळणार्‍या आर्थिक उत्पन्नातून गावातील अनेक शेतकर्‍यांनी टोलेजंग घरे बांधली. कित्येक शेतकर्‍यांनी आलिशान गाड्याही घेतल्या.
मात्र गेल्या एक- दोन वषार्ंपासून गावात डाळिंबाचे उत्पादन न झाल्या मुळे गाड्यांचे हप्तेही वेळेवर जाऊ शकत नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. डाळिंब उत्पादक शेतकर्‍यांना खासगी सावकारांनी पैशाचा तगादा लावल्या
मुळे गावातील काही शेतकर्‍यांनी सोशल मीडियावर घेतलेल्या कर्जाचे व्याज माफ करावे व मुद्दल जसे उत्पन्न होईल, तसे घ्यावे अशा विनंतीचे पत्र सध्या सोशल मीडियावर चांगलेच धुमाकूळ घालत आहे.

संशोधन करून बागा वाचवाव्यात

डाळिंब बागा उद्ध्वस्त झाल्याने अजनाळे गावाची आर्थिक घडी विस्कटल्यामुळे गावातील संपूर्ण व्यवहार ठप्प झाले आहेत. तरी उरल्या सुरल्या डाळिंब बागा संशोधन केंद्राने वाचवाव्यात, अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

Back to top button