मनोहर भोसले म्हणतात, मी बाळूमामांचा वंशज नसून केवळ भक्त | पुढारी

मनोहर भोसले म्हणतात, मी बाळूमामांचा वंशज नसून केवळ भक्त

पुणे; पुढारी वृत्तसेवा : माझ्या बदनामीचे षड्यंत्र रचून खंडणी मागण्याच्या इराद्यातून खोटे आरोप करण्यात येत आहेत. या दरम्यान मी कुठेही गायब झालेलो नाही. गोपाळ अष्टमीसाठी तिरुपती येथे दर्शनाला गेलो होतो. मी बाळूमामांचा अवतार, शिष्य अथवा वारस नसून फक्त भक्त आहे, असे सांगत मनोहर (मामा) चंद्रकांत भोसले यांनी त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांचे मंगळवारी पत्रकार परिषदेत खंडन केले.

मनोहर भोसले म्हणाले, आदमापूर ग्रामस्थांनी मी बाळूमामांचा वंशज नसल्याचा ठराव पास केला आहे. मी बाळूमामांचा वंशज नाही, तसेच मी कोणताही अवतार, बाबा किंवा महाराज नाही. मी फक्त बाळूमामांचा निस्सीम भक्त म्हणून त्यांची सेवा करीत आहे. हे एक धर्मादाय आयुक्त नोंदणीकृत ट्रस्ट असून देणगी स्वरूपात आलेल्या निधीचे ऑडिट होते.

भक्त निवास व बाळूमामांचे मंदिर या ठिकाणी पैसा खर्च होतो. त्याशिवाय अन्यत्र कुठेही पैसा जात नाही. मी ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून लोकांना सल्ला मार्गदर्शन करतो. मात्र, कोणत्याही चमत्काराला थारा देत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी भोसले यांच्यासोबत अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे-पाटील उपस्थित होते.

भोसलेविरोधात बारामतीत तक्रार

संत बाळूमामांचा अवतार म्हणविणार्‍या उंदरगाव (ता. करमाळा) येथील मनोहर भोसले ऊर्फ मनोहरमामाच्या विरोधात बारामतीत फसवणुकीची तक्रार दाखल झाली आहे. महेश आटुळे या बांधकाम व्यावसायिकाने बारामती पोलिसांत तक्रारी अर्ज दिला आहे.

अंगातील भूतबाधा काढतो म्हणून तसेच लाखो रुपये खर्चून बांधलेले रो हाऊसिंग खरेदीसाठी बुकिंग केले. ते पुन्हा रद्द करण्यासाठी पाच लाख रुपये घेतल्याची तक्रार त्यांनी अर्जातून केली आहे. त्यामुळे त्याचा आणखी एक कारनामा समोर आला आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : एक एकर टोमॅटो शेतीसाठी खर्च किती आणि हातात मिळतात किती ?

Back to top button