सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची तुटलेली बोटे पुन्हा जोडली - पुढारी

सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची तुटलेली बोटे पुन्हा जोडली

ठाणे : पुढारी वृत्तसेवा

ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या बोटावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली असून त्याची दोन्ही बोटे जोडण्यात डॉक्टरांना यश आले आहे. ज्युपिटर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया केली असून जोडण्यात आलेल्या बोटांमध्ये चेतना येणार की नाही हे ४८ तासांच्या नंतर स्पष्ट होणार असल्याचे डॉक्टरांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. तर पिंपळे यांची प्रकृतीही आता स्थिर असल्याची माहिती अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त अश्विनी वाघमळे यांनी दिली आहे.

माजिवडा – मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर सोमवारी कारवाईच्या दरम्यान एका फेरीवाल्याकडून जीवघेना हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात पिंपळे यांची दोन बोटे तुटून पडली होती. सुरुवातीला वेदांत आणि त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

त्यांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर मंगळवारी पहाटे त्यांच्यावर शस्रक्रिया करण्यात आली आहे. यामध्ये त्यांच्या डाव्या हाताची तुटून पडलेली बोटे तीन शस्रक्रिया करून जोडण्यात आली आहे. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असल्याच्या दावा डॉक्टरांच्या वतीने करण्यात आला आहे. मात्र जोडलेल्या बोटांमध्ये पुन्हा चेतना येईल कि नाही याबाबत पुढच्या ४८ तासांच्या नंतरच परिस्थिती स्पष्ट होणार असल्याचे रुग्णालयांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

अंगरक्षकाचे बोट सापडलेच नाही

कल्पिता पिंपळे यांच्यासमवेत त्यांच्या अंगरक्षकाच्या हाताचे बोट देखील या हल्ल्यात तुटले होते. पिंपळे यांच्या बोटांचा शोध घेण्यामध्ये यश मिळाले असले तरी,त्यांच्या अंगरक्षकाचे बोट मात्र मिळू शकलेले नाही. सोमवारी रात्री उशिरापर्यंत त्यांच्या बोटांचा शोध घेण्यात आला. मात्र त्यांचे बोट न सापडल्यामुळे त्यांच्या अंगरक्षकाला आपले बोट गमवावे लागले आहे.

हेही वाचले का?

Back to top button