टपाल पाकिटावर अवतरली सोलापुरी चादर! | पुढारी

टपाल पाकिटावर अवतरली सोलापुरी चादर!

पुणे; पुढारी वृत्तसेवा : टपाल खात्याच्या पुणे विभागातर्फे सोलापुरी चादर, टेरीटॉवेल आणि डाळिंब याविषयीचे स्पेशल कव्हरचे प्रकाशन नुकतेच झाले. पुणे विभागाच्या पोस्टमास्तर जनरल जी. मधुमिता दास यांच्या हस्ते स्पेशल कव्हरचे अनावरण झाले.

सोलापूरची लाल-गडद डाळिंबे आणि उत्कृष्ट सुतापासून तयार केलेल्या सोलापुरी चादरी, टेरीटॉवेलला जीआय मानांकन प्राप्त आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोलापूरच्या चादरी, टेरीटॉवेल, डाळिंबाला विशेष मागणी असते. लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योगांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्यांच्या उत्पादनांचे ब्रॅंडिंग करता यावे, या उद्देशाने टपाल खात्याने स्पेशल कव्हर प्रकाशित केले आहे.

सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूरच्या राष्ट्रीय अनार अनुसंधान केंद्राचे संचालक राजीव मराठे, अखिल भारतीय महाराष्ट्र उत्पादक संशोधन संघाचे उपाध्यक्ष प्रतापराव काटे, टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाऊंडेशनचे अध्यक्ष श्रीनिवास बुरा, सोलापूरचे प्रवर अधीक्षक डाकघर व्यंकटेश्वर रेड्डी आदी याप्रसंगी उपस्थित होते.

स्पेशल कव्हरमुळे सोलापुरातील कुशल विणकाम कलाकार, कारागीर, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार वाढीसाठी निश्चितच मदत होईल, असे मत जी. मधुमिता दास यांनी व्यक्त केले.

सोलापूरची डाळिंबे लाल-गडद रंगामुळे आकर्षक दिसतात. प्रतिकूल वातावरणातही डाळिंबाचे फळ टिकते. ते टणकही असते. डाळिंबाचे दाणेही टपोरे आणि चवदार असतात. डाळिंबाच्या बियांमुळेही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार्‍यांचे लक्ष वेधून घेतात. तसेच सोलापूरचे कापड उत्पादन व्यापारामध्येही स्वतःचे वेगळे स्थान प्राप्त केले आहे.

स्पेशल कव्हरचे अनावरण

टपाल खात्याच्या पुणे विभागाने मंगळवेढा ज्वारीसंबंधी एक विशेष कव्हर प्रकाशित केले आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे झालेल्या कार्यक्रमात पोस्टमास्तर जनरल जी. मधुमिता दास यांच्या हस्ते स्पेशल कव्हरचे अनावरण झाले.

यावेळी सोलापूरचे सहायक आयुक्त अर्जुनसिंह पाटील, आत्मा या संस्थेचे प्रकल्प संचालक मदन अभिमान मुकणे, सचिव मंगल श्रीरंग काटे तसेच मालदांडी ज्वारी विकास संघ, पंढरपूर आणि मंगळवेढा येथील अन्य मान्यवर, तसेच पंढरपूरचे डाक अधीक्षक पी. ई. भोसले उपस्थित होते.

Back to top button