बाळूमामा यांचा अवतार म्हणविणारा मनोहरमामा गायब, मंदिराला कुलूप

मनोहर भोसले ऊर्फ मनोहरमामा
मनोहर भोसले ऊर्फ मनोहरमामा
Published on
Updated on

करमाळा (जि. सोलापूर); पुढारी वृत्तसेवा : स्वत:ला आदमापूरच्या संत बाळूमामांचा वंशज, अवतार म्हणविणारा उंदरगाव (ता. करमाळा) येथील मनोहर भोसले ऊर्फ मनोहरमामा गायब झाला आहे. उंदरगावातील मनोहरमामा याने उभारलेल्या बाळूमामांच्या मंदिराला कुलूप लावले असून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

मनोहरमामा नॉट रिचेबल असून पुण्यात मुक्कामाला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे उंदरगावात आता सन्नाटा पसरला आहे.

बाळूमामा आपल्याला प्रसन्न असून त्यांच्या आशीर्वादाने अनेकांचे प्रश्न मार्गी लागतात, असा मनोहर भोसले याचा दावा होता. चेल्यांकरवी याचा पद्धतशीर प्रचार करून मनोहर भोसले याने आपण महाराज असल्याची ख्याती निर्माण केली. त्यातून समस्यांग्रस्त जनतेला संकट दूर करतो, असे सांगून जाळ्यात ओढल्याची चर्चा आहे.

यातून सुटण्यासाठी अमावास्या, पौर्णिमेला उंदरगावातील बाळूमामाच्या मंदिरात त्याने अनेकांना खेटे घालावयास लावले. त्यातून त्याने बक्कळ अर्थप्राप्ती केल्याची चर्चा आहे.

मनोहर भोसले याच्या कारनाम्याला भुलून अनेक नामांकित नेत्यांनी उंदरगावात त्याच्यासमोर लोटांगण घातले. आपसूक त्याचे महत्त्व अधिकच वाढत गेले. त्याच्याबद्दल तक्रारी वाढल्याने उंदरगावातूनच त्याला विरोध होत आहे.

करमाळा तालुक्यातील उंदरगावात सोलापूर, अहमदनगर, लातूर, पुणे, मनमाड, भुसावळ आदी राज्यातील तसेच कर्नाटकातीलही भक्तगणांची रीघ लागत असे. मनोहर महाराजाच्या अंधश्रद्धायुक्त कारनाम्याने बाळूमामाचे मूळ समाधी असलेल्या आदमापुरात त्याचा निषेधाचा ठराव करून भक्तगणांनी फसू नये, असे आवाहन केले आहे.

दरम्यान, येत्या दोन दिवसात तो उंदरगावला परतणार असल्याचेही काही जणांकडून समजते.

'मनोहर भोसलेचा फोटो काढा'

एका मराठी वाहिनीवरून प्रसारित होत असलेल्या 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेतील मनोहर भोसले याचा फोटो त्वरित काढा; अन्यथा तीव्र आंदोलन उभा करू व मालिका प्रसारण बंद पाडू, असा इशारा आदमापूर ग्रामस्थांसह बाळूमामा भक्तांनी दिला आहे.

ग्रामपंचायतीच्या वतीने तशी मागणी करणारे पत्र निर्माता संतोष आयाचित यांना पाठवले आहे. याबरोबरच बाळूमामा देवालय समितीच्या वतीनेही भोसले याचा निषेध करण्यात आला आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : एक एकर टोमॅटो शेतीसाठी खर्च किती आणि हातात मिळतात किती ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news