क्रौर्याची परिसीमा! तालिबान्यांनी एकाला हेलिकॉप्टरला लटकावून शहरभर फिरवलं | पुढारी

क्रौर्याची परिसीमा! तालिबान्यांनी एकाला हेलिकॉप्टरला लटकावून शहरभर फिरवलं

कंदहार; वृत्तसंस्था : अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य परतल्यानंतर काही तासांतच थरकाप उडवणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ कंदहार शहरातील असून एका व्यक्तीला तालिबान्यांनी अमेरिकन ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरला दोरीने लटकावून शिक्षा दिली जात असल्याचे दिसत आहे. यादरम्यान हेलिकॉप्टर अनेक घरांना धडकत आहे आणि त्यातच त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

घटनेनंतर अफगाणिस्तानातील क्रौर्य संपले नसल्याचे चित्र आहे. अमेरिकेसह जगभरातील अनेक पत्रकारांनी माणुसकीला काळिमा फासणारा हा व्हिडिओ समाज माध्यमांवर शेअर केला आहे.

कंदहार शहरात गस्त घालत असताना तालिबानी दहशतवाद्यांना एका व्यक्तीवर संशय आला. त्यानंतर तालिबान्यांनी त्या व्यक्तीला पकडले आणि हेलिकॉप्टरला दोरीने लटकावून शहरभर फिरवले. मृत व्यक्ती कोण आहे, त्याच्यावर कोणता आरोप होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

काहींच्या मते एका व्यक्तीचा मृतदेह हेलिकॉप्टरला लटकावला होता, तर तालिब टाइम्स या सोशल मीडिया अकाऊंटवर या घटनेची माहिती दिली नाही, पण तालिबान कंदहारमध्ये हवाई गस्त घालत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान गेल्या महिन्यात अमेरिकेने अफगाणिस्तानला 7 ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्स दिली होती.

Back to top button