आसरा समांतर उड्डाणपूलासाठी केंद्राकडून 28 कोटींचा निधी मंजूर | पुढारी

आसरा समांतर उड्डाणपूलासाठी केंद्राकडून 28 कोटींचा निधी मंजूर

दक्षिण सोलापूर,  पुढारी वृत्तसेवा :  येथील मध्यवर्ती आसरा समांतर उड्डाण पुलासाठी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी 28 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे पूल उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून, यातून वाहतुकीची कोंडी दूर होणार असल्याचे आमदार देशमुख यांनी सांगितले.

देशमुख म्हणाले, होटगी रोड, जुळे सोलापूर परिसरात उपनगरे वाढली असून, लोकसंख्या वाढल्याने वाहनांची मोठी वर्दळ आहे. या मार्गावरून ऊस कारखान्यासह मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होते. परंतु ही सर्व वाहतूक आसरा पुलामार्गे होत असून, अरुंद पुलामुळे वाहतुकीची कोंडी होते. अनेकवेळा तास न् तास वाहतूक खोळंबते. तसेच अपघाताचे प्रसंगही वाढत आहेत. यावर उपाय म्हणून या पुलाची रुंदी वाढवण्याची मागणी होत होती. विविध संघटनांनीही याबाबत माझ्याकडे पूल उभारणीसंदर्भात आगह धरला होता. एकूणच परिस्थितीचा आढावा घेऊन पुलाची पूल उभारणीसंदर्भात प्रस्ताव तयार केला होता. यासंदर्भात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडेही पाठपुरावा केला होता. याशिवाय महापालिकेच्या अधिकार्‍यांना घेऊन बैठकही घेत आराखडा करण्याच्या सूचना केल्या होत्या.

ते म्हणाले, त्यानुसार महापालिकेने या पूलासाठी विकास आराखडा तयार केला होता. एप्रिल महिन्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे सोलापूर दौर्‍यावर आले असता आमदार सुभाष देशमुख यांनी त्यांच्याकडे आसरा पुलासाठी निधीची मागणी केली होती. त्याचवेळी गडकरी यांनी निधी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आमदार देशमुख यांनी वारंवार गडकरींची भेट घेऊन याचा पाठपुरावा केला. अखेर नितीन गडकरी यांनी या पुलासाठी तब्बल 28 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

Back to top button