सोलापूर : वाहतूक पोलिसांवर खड्डे बुजविण्याची वेळ | पुढारी

सोलापूर : वाहतूक पोलिसांवर खड्डे बुजविण्याची वेळ

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा पावसाळा आला की सोलापुरात जागोजागी खड्डे पडून वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. या त्रासातून काही प्रमाणात सुटका व्हावी, यासाठी चक्क वाहतूक पोलिसांवर पुढाकार घेऊन खड्डे बुजविण्याची वेळ आली आहे. वाहतूक पोलिसांनी समोर उभे राहून मजुरांकडून अशोक चौक पोलिस चौकीसमोरील मोठे खड्डे बुजवून घेतले. सोलापुरातून जाणारा पुणे-विजापूर व विजापूर-हैंद्राबाद या मार्गावरील गुरुनानक चौक-संत तुकाराम चौक-अशोक चौक पोलिस चौकी-व्हिको प्रोसेस-शांती चौक-जुना बोरामणी नाका-मार्केट यार्ड चौक या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.

परिणामी, या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. या रस्त्यावर पडलेले खड्डे भरणे हे आवश्यक होते. परंतु, प्रशासनाकडून हे खड्डे बुजविले गेले नाहीत. त्यामुळे हे खड्डे बुजविण्यासाठी वाहतूक पोलिसांनाच पुढाकार घ्यावा लागल्याचे दिसत आहे. सतत पडणार्‍या खड्डंयामुळे या भागात कायमच वाहतुकीची कोंडी होते. त्यावर प्रशासन उपाययोजना करीत नसल्याने स्थानिकांना त्रासाला सामोरे जावे लागते. खड्ड्यांमुळे वाहनांची गती कमी होत होती. त्यातून कोंडी निर्माण होते. त्यामुळे या मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेतला.

Back to top button