सूत दरात 300 टक्के वाढ; वस्त्रोद्योगावर संकट | पुढारी

सूत दरात 300 टक्के वाढ; वस्त्रोद्योगावर संकट

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा :  सूत दरात सुमारे तीनशे टक्क्यांपर्यंत वाढ तसेच मूलभूत सुविधांच्या अभावामुळे मेटाकुटिला आलेल्या यंत्रमागधारकांनी सोमवारी (दि. 6) रोजी लाक्षणिक बंदची हाक दिली आहे. प्रश्‍नांबाबत प्रशासनाला निवेदन देऊन यंत्रमागधारक शासनाचे लक्ष वेधणार आहेत.

सुमारे पाच वर्षांपूर्वी भविष्य निर्वाह निधी लागू झाल्यानंतर यंत्रमागधारकांनी बेमुदत बंदचे हत्यार उपसले होते. सुमारे महिनाभर हे आंदोलन झाल्यावर त्यांना याप्रश्‍नी सरकारकडून दिलासा मिळाला होता. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा यंत्रमागधारक संघाने सूत दरातील प्रचंड वाढ व मूलभूत सुविधांकडे लक्ष वेधत सोमवारी (दि. 6) रोजी लाक्षणिक बंदचा पवित्रा घेतला आहे. नुकतीच या संघाची सर्वसाधारण बैठक झाली. त्यात प्रश्‍नांचा ऊहापोह करण्यात आला.

मागील काही महिन्यांपासून यंत्रमाग उद्योगामागे कापूस दरवाढीचे शुक्लकाष्ट लागले आहे. यावर्षी कापूस दरवाढीची गुंतागुंत अधिकच जटिल बनत चालल्याचे यंत्रमागधारकांचे म्हणणे आहे. कापूस दरवाढीमुळे देशातील गिरण्यांनी सुरुवातीला सूत उत्पादन घटविले. आता तर उत्पादनच बंद करण्याच्या मन:स्थितीत आहेत. परिणामी संपूर्ण वस्त्रोद्योगच आर्थिक पेचात सापडला. या विषयावर बैठकीत गंभीरपणे चर्चा झाली.

या आहेत विविध मागण्या

शेतीखालोखाल जास्तीत जास्त रोजगार मिळवून देणार्‍या वस्त्रोद्योगाकडे केंद्र व राज्य सरकारचे दुर्लक्ष आहे. कापूस या कच्चा मालाच्या तुलनेत पक्का माल म्हणजे तयार कपड्यांचे मूल्यवर्धित होऊन कितीतरी पटीने किंमत वाढते. त्यामुळे सरकारने कच्चा माल निर्यातीपेक्षा पक्का माल निर्यातीला जास्त प्रोत्साहन द्यायला हवे. व्यापार्‍यांकडून होणारी कापसाची साठवणूक व सट्टेबाजीला आळा घालावा. सूत दर स्थिर ठेवण्याबाबत केंद्र व राज्याने धोरण आखावे.

कापसाच्या कमोडिटी मार्केटवरील व्यवहारांवर निर्बंध घालावेत. हद्दवाढनंतर अक्कलकोट रोड एमआयडीसी मनपाकडे वर्ग झाली; मात्र पाणी , रस्ते , ड्रेनेज, दिवाबत्ती आदी मूलभूत सुविधा म्हणावे त्या प्रमाणात नसल्याने उद्योगवाढीस अडचणी येत आहेत. निर्यातीवरही परिणाम झाला आहे. मूलभूत व पायाभूत सुविधा द्याव्यात तसेच या उद्योगासाठी पाण्याचे आरक्षण ठेवावे, अशा विविध मागण्या संघाने केल्या आहेत.

उत्पादनाला अपेक्षित दर नाही

अवकाळी पाऊस, गुलाबी बोंड अळीचा उपद्रव या कारणास्तव कापसाचे उत्पादन घटले. हे जरी खरे असले तरी आयात-निर्यात धोरणात देशाची गरज ओळखून कापूस निर्यात धोरण आखायला पाहिजे. यंदा देशातील कापूस दरात उच्चांकी म्हणजे 250 ते 300 टक्के वाढ झाली. गेल्या 6-8 महिन्यांत ‘न भुतो…’ अशी वाढ झाली. परिणामी सूत दरातही वाढ होत गेली. या वाढीच्या तुलनेत यंत्रमागावर तयार होणार्‍या उत्पादनाला मात्र अपेक्षित दर मिळाला नाही. त्यामुळे यंत्रमाग उद्योगाचे कंबरडे मोडल्याची भावना या बैठकीत व्यक्त करण्यात आली.

यंत्रमाग उद्योगाच्या विविध प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी लाक्षणिक बंद ठेवणार आहोत. याची दखल न झाल्यास बेमुदत बंद करण्यात येणार आहे.
– पेंटप्पा गड्डम
अध्यक्ष, जिल्हा यंत्रमागधारक संघ

Back to top button