शाळा-दुकानदारांची मैत्री; पालकांच्या खिशाला कात्री | पुढारी

शाळा-दुकानदारांची मैत्री; पालकांच्या खिशाला कात्री

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा :  नवीन शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून सुरू होत आहे. शाळांची भरमसाठ फी आणि त्यातच आता शैक्षणिक साहित्यांचीही भली मोठी यादी यामुळे मोजाव्या लागणार्‍या हजारो रुपयांच्या खर्चामुळेपालकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागत आहे. शाळांचालकांची अन् दुकानदारांची मैत्री असल्याचे बोलले जात असून त्यामुळे मात्र पालकांच्या खिशाला कात्री लागत आहे.

मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा ऑनलाईन स्वरूपात सुरू होत्या. तरीही पालकांना शाळेची शंभर टक्के फी भरावी लागली. तसेच हजारो रुपये खर्च क:न महागडे मोबाईल ऑनलाईन शिक्षणासाठी मुलांना घेऊन द्यावे लागले. परिणामी पालकांना अतिरिक्त खर्च सोसावा लागला होता.

यंदा मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शासनाच्या आदेशाप्रमाणे शाळा पूर्ण वेळ सुरू होणार आहेत. यासाठी पालकांना आतापासूनच शाळेची वाढीव फी व शैक्षणिक साहित्य लागणार्‍या खर्चाची चिंता लागली आहे. इंग्रजी माध्यमातील शाळांनी शैक्षणिक साहित्याच्या यादीसोबत पी.टी.ड्रेस, बॅग, दोन प्रकारचे शूज, सॉक्स यासाठी चक्क साडेतीन हजार रुपये पालकांना मोजावे लागत असल्याची माहिती एका पालकाने दिली. साहित्याव्यतिरिक्त शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी लागणारी वही- पुस्तके हेदेखील ठराविक दुकानामध्ये उपलब्ध असल्याचे समजते.

शाळेकडून पालकांना दुकानदारांच्या पत्रिकासह शैक्षणिक साहित्याची भलीमोठी यादी दिली जाते. यामुळे इंग्रजी शाळांनी दुकानदारांसोबत ठरलेल्या टक्केवारीसाठी हा घाट घातल्याचा संशय सामान्य पालकांतून व्यक्त होत आहे.

ठरवून दिलेल्या दुकानातूनच पुस्तके घेण्याचा आग्रह 

अनुदानित शाळांमधून विद्यार्थ्यांना पुस्तके, गणवेश शाळेकडून दिला जातो. मार्त्रें विनाअनुदानित इंग्रजी माध्यमांच्या शाळा शैक्षणिक साहित्यांसह गणवेश शाळेकडून ठरवून दिलेल्या दुकानातूनच घेण्याचा आग्रह करीत असल्याने पालकांना त्रास सहन करावा लागत आहे.

इंग्रजी माध्यमांच्या शाळा पालकांना विश्वासात न घेता, त्यासंबंधी माहिती न देता शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी ठराविक दुकानातूनच साहित्य खरेदीचा आग्रह धरतात. हे अत्यंत चुकीचे आहे.
– पालक

Back to top button