सोलापूर : क्रिकेटसाठी प्रतिदिन केवळ नऊ हजार | पुढारी

सोलापूर : क्रिकेटसाठी प्रतिदिन केवळ नऊ हजार

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा :  महापालिकेच्या इंदिरा गांधी (पार्क) स्टेडिअमवरील क्रिकेट स्पर्धेसंदर्भातील शुल्कात तीन हजार रूपयांची घट करण्याचा निर्णय बुधवारी जिल्हा स्टेडिअम कमिटीच्या सभेत घेण्यात आला. चार-पाच महिन्यांपूर्वी कमिटीच्या सभेत क्रिकेट स्पधसंदर्भातील शुल्क निश्चिती करण्यात आली होती. या सभेत सोमवार ते शुक्रवार या कालावधीत होणार्‍या स्पर्धेेसाठी 12 हजार तर शनिवार व रविवारसाठी 15 हजार शुल्क निश्चित करण्यात आले होते.

मात्र, हे दर अवाजवी असल्याने ते कमी करण्याची मागणी क्रिकेटसंदर्भातील असोसिएशन व खेळाडूंकडून झाली होती. त्याची दखल घेत बुधवारी झालेल्या कमिटीच्या सभेत फेरविचार करुन येऊन दर तीन हजार रुपयांनी घटविण्यात आले आहेत. आता सोमवार ते शुक्रवारसाठी 9 हजार तर शनिवार व रविवारसाठी 12 हजार शुल्क क्रिकेटप्रेमींना मोजावे लागणार आहे.

या आहेत अन्य सवलती

पाच दिवस चालणार्‍या क्रिकेट टुर्नामेंट स्पर्धेचे शुल्कदेखील या सभेत कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. अशा स्पर्धेसाठी प्रतिदिन 7 हजार रुपये आकारण्यात येणार आहे. याशिवाय शाळा किंवा क्रिकेट संघटनांच्या स्पर्धेसाठी शुुल्कात 10 टक्के तसेच महिलांच्या स्पर्धेसाठी 20 टक्के सवलत देण्याचा निर्णय कमिटीने घेतल्याचे मनपाचे प्रशासक तथा आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले.
सभेला कमिटीचे सचिव विक्रमसिंह पाटील, पोलिस आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून सहाय्यक आयुक्त प्रांजुली सोनवणे, माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा व मनपाचे क्रीडाधिकारी आदी उपस्थित होते.

स्टेडिअमचे लवकरच उद्घाटन

या स्टेडिअममध्ये स्मार्ट सिटीच्या माध्यमातून पुनर्विकासाचे काम सुरु आहे. यापैकी मैदानाचे काम पूर्ण झाल्याने ते मनपाकडे हस्तांतरित झाले आहे. अन्य कामे सुरु असल्याने त्याचे हस्तांतरण बाकी आहे. पुनर्विकास केलेल्या स्टेडिअमचे लवकरच उद्घाटन करण्यात येणार आहे तसेच अन्य खेळांसाठीचे भाडेदेखील लवकरच निश्चित करण्यात येतील, अशी माहिती पी. शिवशंकर यांनी दिली.

पदोन्नतीबाबत लवकरच कार्यवाही

महापालिकेतील डिपार्टमेंटल प्रमोशन कमिटीची (डीपीसी) बैठक झाली नसल्याने सुमारे 250 कर्मचारी व अधिकार्‍यांच्या पदोन्नत्या रखडल्या आहेत. यासंदर्भात विचारले असता शिवशंकर म्हणाले की, डीपीसीची बैठक लवकरच घेण्यात येणार आहे. दरम्यान, पदोन्नतीपूर्वी रिक्त होणार्‍या कनिष्ठ स्तरावर भरतीसाठी भरती नियमावली संदर्भात मंत्रालयाकडून लवकरच माहिती प्राप्त होईल. त्यानुसार कायम भरती प्रक्रियेबाबत नोटिफिकेशन काढण्यात येणार आहे.

सभा, प्रदर्शनासाठी लक्ष्मी-विष्णूची जागा

पार्क स्टेडिअमची जागा आता यापुढे सभा, संमेलन, मेळावे तसेच प्रदर्शनाकरिता देण्यात येणार नाही. अशा कार्यक्रमांना लक्ष्मी-विष्णू मिलची जागा पर्याय म्हणून उपलब्ध करण्यात आली आहे.
एका वर्षानंतर मेंटेनन्सचा मक्ता
स्मार्ट सिटी कंपनी कडून पार्क स्टेडियमचा पुनर्विकास करण्यात आला आहे. काम पूर्ण झाल्यानंतर एका वर्षाकरिता देखभाल दुरुस्तीची (मेंटेनन्स) जबाबदारी मक्तेदारावर राहणार आहे. एकावर्षानंतर मेंटेनन्स कायम ठेवण्यासाठी निविदा काढून मक्ता देण्यात येणार आहे. यामुळे मेंटेनन्स संदर्भात सातत्य कायम राहिल असे शिवशंकर यांनी सांगितले.
पांडेंकडील जबाबदारी घोलप यांच्याकडे देणार
बदली झालेले उपायुक्त धनराज पांडे यांच्याकडील अतिक्रमणासह विविध विभागांची जबाबदारी ही नवीन उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्याकडे देण्यात येणार आहे, असे शिवशंकर म्हणाले.
संस्मरण उद्यानाबाबत सोमवारी सुनावणी
महापालिकेच्या संस्मरण उद्यानासंदर्भात संबंधित संस्था चालकाची सोमवारी सुनावणी घेण्यात येणार आहे, असेही आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.

पार्क चौपाटी रिकामी करण्यासाठी दिली नोटीस

पार्क स्टेडिअमसाठी चौपाटीची जागा पार्किंगकरिता उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे येथील चौपाटी (खाऊगल्ली) ही रिकामी करण्यात येणार असून विक्रेत्यांना होम मैदानालगतची स्ट्रीट बाजाराची जागेचा पर्याय सुचविण्यात आला आहे. चौपाटी रिकामी करण्यासाठी मनपातर्फे 81 ब ची नोटीस विक्रेत्यांना देण्यात आली आहे. चार पुतळ्यामागील खेळण्यांसाठी दिलेली जागादेखील यापुढे फक्त पार्किंगसाठीच राहील, असे पी. शिवशंकर यांनी सांगितले.

Back to top button