सातारा : एव्हरेस्टवीर प्रियांकाचे जल्लोषी स्वागत | पुढारी

सातारा : एव्हरेस्टवीर प्रियांकाचे जल्लोषी स्वागत

सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातार्‍याचे नाव जगाच्या नकाशावर कोरणार्‍या एव्हरेस्टवीर प्रियांका मंगेश मोहिते हिला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते देशाचा सर्वोच्च तेनजिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर तिचे सातारा येथेरविवारी सायंकाळी जंगी स्वागत करण्यात आले.

सातारकरांच्या वतीने जल्लोषात स्वागत करून मिरवणूक काढण्यात आली. आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते तिचा सत्कारही करण्यात आला. नवी दिल्लीत पुरस्कार स्वीकारल्यानंतर एव्हरेस्टवीर प्रियांका मंगेश मोहिते रविवारी सातार्‍यात दाखल झाली. पोवई नाका येथील शिवतीर्थ येथे आगमन झाल्यानंतर प्रियांकाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

त्यानंतर राजधानी सातारा या सेल्फी पॉईंटवर आ. शिवेंद्रराजे भोसले व दै.‘पुढारी’चे वृत्त संपादक हरिष पाटणे, ज्येष्ठ पत्रकार शरद काटकर, दीपक शिंदे, दीपक प्रभावळकर, नगरसेवक अमोल मोहिते यांच्या हस्ते प्रियांका मोहिते हिचा सातारकरांच्या वतीने सत्कार करण्यात आला. आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, सातारची सुकन्या प्रियांका मोहिते हिला तेनजिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.

ही समस्त सातारकरांसाठी अभिमानाची बाब आहे. प्रियांकाने जगातील सर्वांत उंच असणारी शिखरे सर करण्याची कामगिरी केली आहे. भविष्यातही अनेक साहसी मोहिमा ती यशस्वी करणार असून, सातार्‍याचे नाव जागतिक पातळीवर पोहोचविणार आहे. एव्हरेस्टवीर प्रियांका मोहिते म्हणाली, 13 नोव्हेंबर हा दिवस मी विसरू शकणार नाही. गेली 11 वर्षे अजिंक्यतार्‍यापासून शिखरे सर करण्यास सुरुवात केली. हिमालयासह अनेक शिखरे सर करण्याचा मान मिळाला.

गिर्यारोहणामध्ये सर्वात उच्च असणारा पुरस्कार मिळाला असल्याने भावना व्यक्‍त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. हा पुरस्कार केवळ माझा नसून माझ्या कुटुंबाचा, सातार्‍याचा आणि महाराष्ट्राचा आहे.अनेक वर्षे महाराष्ट्राला गिर्यारोहणात पुरस्कार मिळाला नव्हता. या निमित्ताने गिर्यारोहणात महाराष्ट्राचे नाव होत आहे, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे.

पोवई नाक्यावरून ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत प्रियांकाची मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी तिचे सातारकरांनी स्वागत केले. स्वागत सोहळ्यास माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे, फिरोज पठाण, इर्शाद बागवान, निशांत गवळी, मंगेश मोहिते, नीलेश महाडिक, कमलेश पिसाळ, सिद्धार्थ लाटकर आदींची उपस्थिती होती. यावेळी शहरातील विविध क्रीडा संस्था, गणेशोत्सव मंडळ, नवरात्रौत्सव मंडळ, सामाजिक संस्था, क्रीडाप्रेमीआदी सहभागी झाले होते

राजधानी सातारा या सेल्फी पॉईंटवर आ. शिवेंद्रराजेंची प्रियांकासोबत पहिली सेल्फी

सातार्‍याचे नाव जगाच्या नकाशावर कोरणार्‍या एव्हरेस्टवीर प्रियांका मंगेश मोहिते हिने देशाचा सर्वोच्च तेनजिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार मिळविल्यामुळे तिचे नाव आता देशाच्या क्रीडा जगतावर नाव सुवर्णअक्षराने कोरले गेले आहे. आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी तिचे अभिनंदन केल्यानंतर पोवईनाका येथील त्यांच्याच संकल्पनेतून उभारलेल्या राजधानी सातारा या सेल्फी पॉईंटवर प्रियांकासोबत पहिली सेल्फी घेतली.

पाहा व्हिडिओ

आमच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत, म्हणून आम्ही संपात उतरलोय

Back to top button